कुठं कारवाई तर कुठं केवळ बॅरिकेडींग, पुण्यातील कडक लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 10:53 PM2020-07-14T22:53:24+5:302020-07-14T22:54:34+5:30
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाºया मार्गांवर १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत
पिंपरी : अत्यावश्यक सेवेचा पास काढून काही जण दुचाकीवरून डबलसीट तसेच विनामास्क जात असल्याचे लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरातील काही भागात दिसून आले. नाकाबंदीच्या ठिकाणी अशा वाहनचालकांना अडविण्यात येत होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली. मात्र काही ठिकाणी केवळ बॅरिकेडिंग केली होती.
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाºया मार्गांवर १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तेथे शस्त्रधारी पोलीस तसेच महापालिकेचे पथक तैनात आहे. बाहेरून येणाºया वाहनचालकांची त्यांच्याकडून चौकशी केली जात होती. ई-पास तसेच ओळखपत्राची तपासणी करून खातरजमा केली जात होती. मात्र काही ठिकाणी केवळ एक-दोन पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे वाहनचालक बिनदिक्कत जात होते. त्यांची तपासणी होत नव्हती. पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या कॅम्पमधील शगुन चौक परिसरातील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेच्या या भागात शुकशुकाट होता. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास येथे पोलिसांची केवळ एक गाडी होती. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास पोलिसांचा ताफा येथे दाखल झाला. त्यात ध्वनिक्षेपक असलेली रिक्षा देखील होती. लॉकडाऊनबाबत माहिती देऊन घरातच थांबण्याचे आवाहन त्याव्दारे केले जात होते.
पुणे येथून पिंपरीकडे येणाºया मार्गावर दापोडी येथे हॅरिस पुलाजवळ चेकपोस्ट उभारून नाकाबंदी करण्यात आली होती. तेथे महापालिका कर्मचारी, वाहतूक विभागाचे कर्मचारी, होमगार्ड व पोलीस असे संयुक्त पथक होते. मास्क न लावलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली जात होती. त्यांना ५०० रुपये दंडाची पावती दिली जात होती. दुपारी एकपर्यंत १० जणांना दंड केला होता. तर पास किंवा ओळखपत्र नसलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले जात होते. दुपारी एकपर्यंत आठ खटले दाखल केले होते. वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहनचालकांना फिरण्याचे कारण विचारत होते. कासारवाडी येथील नाशिक फाटा येथे बॅरिकेटड्स लावण्यात आले होते. मात्र पोलिसांकडून तपासणी होत नव्हती. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असल्याने वाहनचालक त्याचे पालन करून स्वयंशिस्त पाळत होते.
भोसरी येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस टर्मिनस जवळ नाकाबंदी होती. तेथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. बहुतांश वाहनचालकांजवळ ओळखपत्र तसेच इ-पास होते. मात्र काही वाहनचालकांकडे सबळ कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास देखील मोठ्या संख्येने येथे वाहनांची ये-जा सुरू होती. मोशी येथील टोलनाक्यावर भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून नाकाबंदी केली होती. चाकणकडून येणाºया वाहनांची येथे तपासणी केली जात होती. दुपारची वेळ असूनही येथे वाहनांची मोठी ये-जा होती. दोनच्या सुमारास देखील पोलीस भर रस्त्यात थांबून वाहनांची तपासणी करीत होते. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केले जात होते.
दुचाकीवर पोलीस लिहिल्याने संशय
दुपारी दोनच्या सुमारास येथून जाणाºया एका दुचाकीस्वाराचा संशय पोलिसांना आला. दुचाकीवर पोलीस लिहून तसेच पोलिसांचा लोगो लावून तो जात होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. तो किंवा त्याच्या कुटुंबात कोणीही पोलीस नसल्याचे समोर आले. काही रोकड तसेच इतर कागदपत्रे त्याच्याकडे मिळून आली. मात्र ती रक्कम एटीएममधून काढून तो त्याच्या बायकोला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जात असल्याचे त्याने सांगितले. तसेच एटीएममधून रोकड काढल्याचे पुरावेही सादर केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले.