सोमवती अमावस्येची ‘स्थायी समिती’ला भीती

By admin | Published: August 26, 2014 05:01 AM2014-08-26T05:01:57+5:302014-08-26T05:01:57+5:30

स्थायी समितीला आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. सायंकाळी उशिरा थोड्या अवधीत उरकलेल्या सभेत ५०० कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली.

Somvati Amavasya's 'Standing Committee' fears | सोमवती अमावस्येची ‘स्थायी समिती’ला भीती

सोमवती अमावस्येची ‘स्थायी समिती’ला भीती

Next

पिंपरी : हातात फायली घेतलेले अधिकारी, आपल्या फाईलवर सही होते की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी आलेले ठेकेदार, तसेच स्थायी समितीवर अर्थकारण अवलंबून असलेली मंडळी दिवसभर महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर घुटमळताना दिसून येत होती. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांप्रमाणे महापालिकेच्या लिफ्टच्या फेऱ्या दिवसभर सुरू होत्या. स्थायी समितीला आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. सायंकाळी उशिरा थोड्या अवधीत उरकलेल्या सभेत ५०० कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली.
आचारसंहिता कधीही लागू होईल, या धास्तीने अवघ्या काही मिनिटांत कोट्यवधींच्या विषयांना मंजुरी देण्याचा धडाका स्थायी समितीने लावला आहे. सकाळी ११ ला होणारी सभा दहालाच बोलावण्यात आली. पाच मिनिटांतच ती दुपारी चारपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभापती महेश लांडगे यांनी आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेऊन सभेपुढे जास्तीत जास्त विकासकामांचे प्रस्ताव ठेवावेत, असा आग्रह धरल्यामुळे आयुक्त जाधव यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या. आयुक्तांच्या सूचना हाच आदेश मानून प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली. कोट्यवधींच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे दाखल करण्यास अधिकाऱ्यांनी धावपळ केली.
दुपारी चारला सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी सभेसाठी सभागृहात येऊन बसले. सायंकाळचे सहा वाजले, तरी सभेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सर्व अधिकारी तब्बल तीन ते साडेतीन तास सभागृहात सदस्यांची वाट पाहत ताटकळत बसले होते. सायंकाळी सहाला सभापती महेश लांडगे व इतर सदस्य सभागृहात आले. ७.४३ मिनिटांपर्यंतचा कालावधी सोमवती अमावस्येचा आहे, ही बाब कोणीतरी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अधिकारी हजर, प्रस्तावाच्या फायली पुढे तरीही आमावस्या टाळण्यासाठी सभा साडेसातनंतर सुरू झाली. विषयपत्रिकेवरील विषयांसह सुमारे १६५ विषय ऐनवेळी घुसविण्यात आले. आळंदी-बीआरटी रस्त्याचा ६५ कोटींच्या खर्चाचा विषय मंजूर करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: Somvati Amavasya's 'Standing Committee' fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.