दशक्रिया विधीसाठी निघालेल्या आई - मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 02:24 PM2018-02-17T14:24:26+5:302018-02-17T16:36:02+5:30
दोन दुचाकींच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे
यवत - दोन दुचाकींच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड (ता.दौंड) गावाच्या हद्दीत आज (दि.१७) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार , वरवंड गावानजीक कवटीचा मला परिसरात पुणे -सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन येथील सोमनाथ लक्ष्मण सुतार (वय - २९) हा त्याची आई सुलाबाई लक्ष्मण सुतार (वय - ४८) यांच्यासह नरसिंहपूर येथे दशक्रिया विधीसाठी आपली दुचाकी (क्र.एम.एच.१२ , पी.वाय.५४७५) वरुन जात होता.यावेळी वरवंड येथील लव्हाजी दत्तात्रय दिवेकर (वय - ५७) हे दुचाकी (क्र. एम.एच.४२, ए. टी.१३६३) वरून महामार्ग ओलांडत असताना दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाली.यावेळी सुतार यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रकने सोमनाथ सुतार व त्यांची आई सुलाबाई सुतार यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दुसऱ्या दुचाकीवरील जखमी लव्हाजी दिवेकर यांच्यावर वरवंड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.
कवटीचा मळा परिसरात अपघात घडल्याची बातमी समजल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी आले होते. पोलिसांनी अपघातस्थळी येऊन मृतदेह यवत मधील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.