आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन! सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:29 AM2021-08-23T10:29:06+5:302021-08-23T10:32:11+5:30
पुण्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न
पुणे: सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. शिवाजीनगर-गोखलेनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या निखिल धोत्रे नावाच्या तरुणानं रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. राहत्या घरी पत्नीच्या ओढणीनं गळफास लावून निखिलनं जीवनयात्रा संपवली. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. निखिलनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सासरच्या जाचाचा आणि कर्जबाजारीपणाचा उल्लेख आहे.
पुण्यातल्या शिवाजीनगर-गोखलेनगर परिसरात भागात असलेल्या सुगम चाळीत वास्तव्यास असलेल्या निखिल धोत्रेनं काल आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीदेखील जवळच सापडली. सासरच्यांकडून होणारा त्रास आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमधून करण्यात आली आहे.
निखिलचा आईसाठी संदेश
निखिल धोत्रेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईसाठी भावनिक संदेश आहे. 'आई तू काळजी करु नकोस. मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ. त्याची काळजी घे,' असं निखिलनं चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.