मुलगा 'गे' असल्याचे लपवून लग्न लावले; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासर्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 11:55 AM2024-03-08T11:55:57+5:302024-03-08T11:56:45+5:30
तरुणासोबत लग्न झाल्यानंतर तो समलैंगिक असल्याचे महिलेच्या लक्षात आले
किरण शिंदे
पुणे: स्वतःचा मुलगा 'गे' असल्याचे लपवून आई-वडिलांनी मोठ्या थाटामाटात त्याचा विवाह लावून दिला. मात्र लग्न झाल्यानंतर त्याचे पितळ उघड पडले. त्यानंतर नवविवाहितेने पोलीस स्टेशन गाठत थेट तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३४ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार २८ वर्षीय पतीसह सासू-सासरे यांच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात ४९८ (अ), ४२०, ५०४,३४ या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहतात. जुलै २०२२ रोजी त्यांचे २८ वर्षीय तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर पती समलैंगिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी सासू-सासरे यांच्याकडे विचारणा केली असता फिर्यादीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. कार घेऊन येण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आला. यानंतर मात्र फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. स्वतःचा मुलगा 'गे' असल्याचे माहित असून सुद्धा लपवून ठेवत लग्न लावून दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.