पुण्यात सायकल दुरुस्त करणाऱ्या काळे काकांचा मुलगा बनला 'न्यायाधीश'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:27 PM2022-03-29T21:27:48+5:302022-03-29T21:27:58+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिवसरात्र अभ्यास करत त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (जेएमएफसी) पद प्राप्त केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पांडुरंग मरगजे
धनकवडी : "अनंत आमुची ध्येयासक्ती अन् अनंत आशा, किनारा तुला पामराला" हे कवी कुसुमाग्रजांचे गीत प्रत्यक्षात आणत गुलटेकडी औद्योगिक वसाहतीत एका सायकल दुरुस्ती करणाऱ्या श्रीधर काळे यांचा मुलगा प्रथमवर्ग न्यायाधीश बनला असून अँड रवी काळे असे या मुलाचे नाव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिवसरात्र अभ्यास करत त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (जेएमएफसी) पद प्राप्त केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रीधर काळे यांचे मुळ गाव अहमदनगर येथील श्रीगोंदा, उदरनिर्वाहासाठी ते पुण्यातील गुलटेकडी भागात आले आणि सुरुवात चहाच्या टपरी पासून केली. कालांतराने त्यांनी सायकल दुरुस्ती चे दुकान सुरू केले. रवी हा त्यांचा मुलगा.
अँड रवी काळे यांचे प्राथमिक शिक्षण संत नामदेव माध्यमिक विद्यालय महर्षी नगर येथे झाले. स.प. महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. परंतु केवळ ३ गुण कमी पडल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाला मुकावे लागले. परंतु हिंमत न हारता रवी काळे यांनी यशवंतराव चव्हाण कॉलेज मधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान २०१७ मध्ये लग्न झाल्यानंतर रवी काळे यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश पदाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान त्यांना प्रताप परदेशी, गणेश शिरसाट, श्रीनिवास मोरे, संतोष चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर वडील श्रीधर काळे यांचा सदैव पाठिंबा लाभला.
रवी काळे यांनी २०१९ मध्ये पूर्व परीक्षा २०२१ मध्ये मुख्य परीक्षा तर २०२२ मध्ये मुलाखत परीक्षा दिली. २४ मार्चला निकाल लागला. त्यामध्ये अँड. रवी काळे यांना २५० पैकी १४४ गुण मिळाले आणि त्यांची प्रथम वर्ग न्यायाधीश पदी निवड झाली. अँड. रवी काळे यांनी मिळवलेल्या या उत्तंग यशाबद्दल गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला यांनी अँड काळे यांचा यतोचित सन्मान केला.