प्रेमसंबंध जुळवून लग्नाचे आमिष; अत्याचार अन् गर्भपातही केला, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:23 IST2025-04-02T16:18:44+5:302025-04-02T16:23:05+5:30
दोघांचे लग्न झाले असून कौटुंबिक वादातून बदनामी करण्याच्या उद्देशाने बलात्कार सारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे, असे वकिलांनी सांगितले आहे

प्रेमसंबंध जुळवून लग्नाचे आमिष; अत्याचार अन् गर्भपातही केला, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप
पुणे : तरूणीशी प्रेमसंबंध जुळवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. याप्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण दिलीप नवले (रा. फ्लॅट नंबर ३०१, बी विंग, सन युनिव्हर्स सोसायटी, नवले ब्रिज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. पिडीत तरूणीचा व्यवसाय आहे. ती देखील आरोपीच्या जवळच असलेल्या परिसरात राहण्यास आहेत. करण नवले आणि तिची २०२१ मध्ये एका जीमध्येमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटणे बोलणे सुरू होते. त्यांच्यात मैत्री आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असत. काही दिवसांनी पिडीतने करणला लग्नाबाबत विचारणा केली त्यावर त्याने टाळाटाळ केली. पिडीतेला त्याचे इतर मुलींशी प्रेमसंबध असल्याचा संशय आल्याने तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर नवले याने तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले. घडलेली हकीकत तिने त्याच्या आईला सांगितली. त्यावर करणने तिला १७ डिसेंबर २०२२ रोजी भेटून मला शेवटचे भेट नाही तर मी तुला संपवून टाकेल अशी फोनवरून धमकी दिली. त्यावर तिने पुन्हा त्याच्या आईला प्रकार सांगितला. त्यावर त्याच्या आईने तु माझ्या मुलाचे वाटोळे केले आहे, तुझ्यापर्यंत पोहोचायला मला पाच मिनिटे लागणार नाही, तु या परिसरात राहायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. त्यानंतर करणने पुन्हा पिडीतेला गळ घालून मी तुझ्याशी लग्न करणार आहे. थोडासा वेळ दे म्हणत पुन्हा नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून तरूणी गर्भवती राहिल्यानंतर त्याने घरचे आता लग्नासाठी ऐकणार नाही म्हणत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर २०२४ मध्ये तरूणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाले. दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आळंदी येथे त्यांनी लग्न केल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. ती गर्भवती असताना त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवले. तसेच गर्भपात करण्यासाठी बाटलीत गोळ्या घालून प्यायला लावले. परंतु त्याच्या या प्रकाराला घाबरून आजीची तब्बेत खराब असल्याचे सांगून तीने अहिल्यानगरला जायचे आहे असे खोटे सांगितले. १३ मार्च रोजी पीडिता पुण्यात आली, नंतर तिने या अत्याचाराचाबाबत तक्रार दिली.
मुंबई उच्च न्यायालयात जाणार
भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाच्या बाबतीत नमूद गुन्ह्यातील मुलगी ही गरोदर असून या दोघांचे 16/02/2025 रोजी आळंदी लग्न झाले आहे. केवळ कौटुंबिक वादातून, नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने लग्न झाले असूनही बलात्कार सारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे. या तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा रद्द आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहोत. - वकील विजयसिंह ठोंबरे.