पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:15 PM2020-02-11T18:15:25+5:302020-02-11T18:15:45+5:30
एकरकमी फीची सक्ती करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी
पुणे : नर्सरीच्या प्रवेशासाठी एक रकमी फी फरण्याची सक्ती करत पूर्ण रक्कम भरण्यासाठी गेलेल्या पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना वडगावशेरी येथे घडली. याप्रकरणी गरीब कष्टकरी पालकांना संपूर्ण फीची सक्ती करत प्रवेश नाकारणाऱ्या मुजोर मुख्याध्यापिकेसह संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भिमराव गलांडे यांनी केली आहे.
वडगावशेरी येथे पंक्चर दुकानात काम करणाऱ्या विठ्ठल बडे यांनी मुलगा आरूष याच्या नर्सरीच्या प्रवेशासाठी विद्यांकुर शाळेत मागील महिन्यात अर्ज दाखल केला होता. मुलाचा प्रवेश निश्चित झाला असून प्रवेशाची रक्कम भरण्यासाठी शाळेत येण्याचा मेसेज त्यांना केला. 7 फेब्रुवारी रोजी पैसे भरण्यासाठी शाळेत गेले असता प्रवेश फी मधील पैसे भरण्यासाठी सवलत मिळावी अशी विनंती मुख्याध्यापिके कडे केली होती.फीचे संपूर्ण पैसे एकरकमीच भरावे लागतील असे मुख्याध्यापिकेने खडसावून सांगितले.यानंतर बडे यांनी ही बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भिमराव गलांडे यांना ही समस्या कथन केली. बडे यांच्या सह शाळेत जाऊन गलांडे यांनी देखील मुख्याध्यापिकेला विनंती केली. मात्र "त्या" एक रकमी फी वसूलीवर ठाम होत्या. 10 फेब्रुवारी रोजी शाळेत संपूर्ण फी भरण्यासाठी गेले असता 19 फेब्रुवारी पर्यंत फी भरण्यासाठी मुदत असल्याचे त्यांना सुरक्षारक्षकाने सांगितले.
मंगळवारी प्रत्यक्ष मुख्याध्यापिकेची भेट घेतली असता प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून आता तुम्हाला प्रवेश देता येणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ एकरकमी फी न भरल्यामुळे गरीब पालकाला आपल्या पाल्याचा प्रवेश नाकारण्यात आला. या गंभीर घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भिमराव गलांडे यांनी संताप व्यक्त केला. पंक्चर दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाचा प्रवेश केवळ एकरकमी फी न भरल्याने प्रवेश नाकारणारे विद्यांकुर शाळा प्रशासन व मुख्याध्यापिका यांच्यावर कारवाई ची मागणी लांडे यांनी केली आहे.