कुंजीरवाडीतील सोनार व टेलरने घातला तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा, दोघे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:44+5:302021-08-01T04:10:44+5:30
सदर सोनार आणि टेलर या दोघांनी गंडा घातलेले बहुतांश गुंतवणूकदार हे सर्वसामान्य असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उरुळी कांचन ...
सदर सोनार आणि टेलर या दोघांनी गंडा घातलेले बहुतांश गुंतवणूकदार हे सर्वसामान्य असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उरुळी कांचन येथील भरत जोशी प्रकरणात काहींनी तक्रार दिल्याने लोणी काळभोर पोलिसांनी जोशी व त्यांच्या परिवाराला गुजरातच्या सीमेवर जेरबंद करण्यात यश मिळवले. व त्याच्या मुसक्या आवळल्या. परंतू या दोघांविरोधांत अद्यापही कोणी तक्रार देण्यास न आल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.
परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार मूळ हडपसर येथील सोनार हा गेली ३० वर्षापासून कुंजीरवाडी येथे सोन्याचे दुकान थाटून बसला आहे. सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून त्याने गहाण, मोड, भिशी व ठेवी याव्दारे सुमारे १५० जणांची फसवणूक केली आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. यासर्वाना तो सुमारे एक ते दीड कोटी रुपयेना गंडवून घालून फरार झाला आहे. तर मूळचा शिरूर येथील टेलर हा गेली पंधरा ते वीस वर्षे कुंजीरवाडी येथे व्यवसाय करत आहे. त्याने भिशी सुरु केली. त्यामध्ये ७० ते ८० लोकांनी गुंतवणूक केली. सोनाराप्रमाणे तो सुद्धा फरार झाला आहे. यांमुळे गुंतवणूकदार मात्र हवालदिल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या दोघांविरोधांत कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत असताना याप्रकरणी दोन जण तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतू त्याची दाखल घेतली नाही. त्यामुळे ते दोघे अद्यापही मोकाट फिरत आहेत.
राजेंद्र मोकाशी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर ) : यासंदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी न घाबरता तक्रार द्यावी म्हणजे आम्हास तात्काळ कारवाई करता येईल.