सोनसाखळी चोरीचे सत्र सुरुच
By admin | Published: June 14, 2014 01:56 AM2014-06-14T01:56:20+5:302014-06-14T01:56:20+5:30
शहरात सोनसाखळी चोरीचे सत्रच सुरू असून, वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे
पिंपरी : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्रच सुरू असून, वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
प्रज्ञा अमित म्हेत्रे (वय २४, रा. एकता कॉलनी, म्हेत्रेवस्ती, चिखली) या स्पाइन सिटी ते खंडेवस्ती या रस्त्यावरून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीसमवेत दुचाकीवरून घरी जात होत्या. दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ६४ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकाविली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत चिंचवड, पूर्णानगर येथील राघवेंद्र हॉटेलसमोरून गुरुवारी सकाळी पायी जात असताना इंदिरा गणेश ठाकरे (वय ५२, रा. एकता मैदान, राठीनगर, अमरावती) यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. ठाकरे या त्यांच्या सुनेसह रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील ५४ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकाविली.
प्रीती राहुल रासकर (वय २७, रा. समर्थनगरी सोसायटी, स्पाइन रोड, भोसरी) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. गुरुवारी दुपारी सासू व इतर महिलांसमवेत पायी जात असताना घरासमोरच ही घटना घडली. (प्रतिनिधी)