गाणे हेच माझे जीवन : उषा मंगेशकर
By admin | Published: December 31, 2014 12:25 AM2014-12-31T00:25:28+5:302014-12-31T00:25:28+5:30
लतादीदी आणि आशाताई यांच्याकडून गाणे शिकत गेले. आज गाणे हेच माझे जीवन आहे. या जीवनगौरव पुरस्काराने गाण्यातील ऊर्मी वाढली आहे,’’ अशी भावना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
पुणे : ‘‘लतादीदी आणि आशाताई यांच्याकडून गाणे शिकत गेले. आज गाणे हेच माझे जीवन आहे. या जीवनगौरव पुरस्काराने गाण्यातील ऊर्मी वाढली आहे,’’ अशी भावना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथे आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विशेष जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते मंगेशकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उद्योगपती डॉ. अविनाश राचमाले, गुरुवर्य श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रामदास फुटाणे, प्रा. राहुल कराड, डॉ. संजय उपाध्ये, आदिनाथ मंगेशकर, सुचित्रा नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उषा मंगेशकर म्हणाल्या, ‘‘आम्हा पाचही भावंडांना वडिलांकडून सूर, तर आईकडून चांगली शिकवण मिळाली. लतादीदीकडून मार्गदर्शन लाभले. तिच्याकडून सुरातला चढऊतार शिकले. लतादीदी व आशाताई दोघी आपापले स्थान बनवत होत्या. त्यांच्याकडे बघून मी शिकत गेले. गाणे हे आपले जीवन आहे, असे वाटत होते. लतादीदींच्या गाण्यात एक प्रकारचा अलौकिक मिलाफ आहे. त्यामुळे आजच्या पिढीने तिच्या गाणाचा अभ्यास करावा.’’
डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, ‘‘धर्मसंस्कृतीचे वर्णन भारतीय संगीत असे आहे. भारतीय संगीत आणि मंगेशकर कुटुंबीय यांचा
अनोखा मिलाफ आहे.’’ प्रा.
डॉ. मंगेश कराड यांनी आभार
मानले.(प्रतिनिधी)