पोराचं वय ७८, बापाचं ७३ एसटीने करतायेत मोफत प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 02:23 PM2023-05-24T14:23:31+5:302023-05-24T14:25:01+5:30
पोलिस ठाण्यात कोण जाणार?...
- रोशन मोरे
पिंपरी : वल्लभनगर आगाराच्या एसटी बसने बाप आणि लेक हे जालना ते सिंदखेड राजा प्रवास करत होते. वाहक तिकीट काढण्यासाठी त्यांच्याजवळ गेला असता बापाचे वय ७३, तर मुलाचे वय ७८ असलेले आधार कार्ड त्यांनी वाहकाकडे देऊन मोफत प्रवासाची मागणी केली. दोघे जण एकमेकांच्या शेजारी बसले असल्याने ते बाप लेक असल्याचे आणि त्यांच्या वयातील अंतर दिसून येत असल्याने वाहकाने सुरुवातीला त्यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र, दोघांकडे असणाऱ्या आधार कार्डवरील जन्मतारखेमुळे त्यांनी सांगितलेले वय बरोबरच होते. त्यामुळे वाहकाने बापाचे हाफ तिकिटाचे पैसे घेतले, तर मुलाला मोफत प्रवास करण्याची मुभा दिली. अशी बनावट आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या साहाय्याने मोफत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वाहक नोंदवत आहेत.
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीने मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीला हाफ तिकीट, तसेच महिलांना हाफ तिकीट अशा विविध योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नसलेले नागरिकदेखील आपल्या वयाची खोटी कागदपत्रे दाखवून बिनधास्त मोफत प्रवास करत असल्याचा अनुभव वाहकांना येतो आहे. एसटी बसमध्ये आधार कार्डवर दाखवून त्यातील जन्मतारखेवर प्रवाशाचे वय जास्त दिसते. मात्र, प्रत्यक्षात तो प्रवासी कमी वयाचा दिसून येतो. काही वाहक याच्यावर आक्षेप घेतात. मात्र, गाडी पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यापेक्षा ते वरिष्ठांशी संपर्क साधतात. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे इतर ओळखपत्रावर देखील तीच जन्मतारीख असेल तर मोफत प्रवासाची मुभा देतात.
पोलिस ठाण्यात कोण जाणार?
वल्लभनगर आगारातील एक वाहकाने सांगितले की, आधार कार्डद्वारे आपले वय जास्त असल्याचे बनावट आधार कार्ड दाखवून ७५ वर्षांवरील नागरिकांना असणाऱ्या मोफत प्रवास सवलतीचा फायदा घेत ७५ वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक या योजनेचा लाभ घेतात. आपली गाडी लांब पल्ल्याची असल्याने विनाकारण त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो. पोलिस ठाण्यात गाडी नेऊन विनाकारण तेथे खोळंबून राहावे लागते. वरिष्ठांना फोन केला असते ते पोलिस ठाण्यात जा म्हणून सांगतात. मात्र, एसटीत असणारे इतर प्रवासी याला विरोध करतात. आपल्याला पुढची गाडी पकडायची आहे, अशा सबबी सांगून एसटी घेऊन जाण्यास सांगतात. वय लपवून मोफत अथवा हाफ तिकिटात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही निरीक्षण या वाहकाने नोंदवले.
बनावट आयकार्ड वापरून प्रवास करणाऱ्यांच्या संदर्भात वाहकांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. जर अशी तक्रार झाली तर याबाबत वरिष्ठांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- संजय वाळवे, व्यवस्थापक, वल्लभनगर आगार