भांडण होताच, शिक्षकांना सांगा, पोलिसांना कळवा - पोलीस काकांचे विद्यार्थ्यांना समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 04:48 PM2017-09-18T16:48:59+5:302017-09-18T16:49:53+5:30
विद्यार्थ्यास मारहाण करणा-यास पोलिसांनी समज दिली. शिवाय उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी समुपदेशन केले.
पिंपरी, दि. 18 : कुदळवाडीतील पवारवस्ती येथील सरस्वती विद्यालयात नववीत शिकणा-या एका मुलाला डोक्यात शाळेच्या गणवेशाचा कोट अडकवुन सहा सात विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्या पालकांनी कुदळवाडी पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. त्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धावुन आले. विद्यार्थ्यास मारहाण करणा-यास त्यांनी समज दिली. शिवाय उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी समुपदेशन केले. शाळेत भांडण झाल्यास सुरूवातीस शिक्षकांना सागा,त्यांनी दखल न घेतल्यास पोलिसांना कळवा, वेळीच उपाययोजना केल्या जातील. असे आश्वासन निगडीचे पोलीस निरिक्षक शंकर आवताडे यांनी दिले.
कुदळवाडीच्या शाळेत थट्टा, मस्करीतून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. या मारहाणीत विद्यार्थी जखमी झाला असून डोके मान व पाठीला मुका मार लागला आहे . मुलाच्या पालकांनी तक्रार दाखल करताच काही वेळेतच निगडी पोलीस चौकीतून पोलीस निरिक्षक शंकर अवताडे व कुदळवाडी चौकीचे शंकर यमगर या पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शाळेत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली. संबधिंत विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून दिले.
शाळेत आणि शाळेच्या आवारात भांडण, तंटा झाल्यास पहिल्यांदा वर्गशिक्षकांना माहिती द्या, त्यांनी दखल न घेतल्यास मुख्याध्यापकांना सांगा, त्यांच्याकडूनही वेळीच दखल न घेतल्यास पोलिसांना कळवा. शाळेच्या आवारातील फलकावर पोलीस काकांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्या क्रमांकावर संपर्क साधून पोलीस काकांना बोलवा. तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. असे आश्वासन आवताडे यांनी विद्यार्थ्यांना दिले. महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी ‘बडी कॉप’ ही सुविधा पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मोबाईलअॅपवरसुद्धा उपलब्ध झाली असून त्या सुविधेचाही लाभ घेता येईल. असे त्यांनी नमूद केले.