Pune: लवकरच एकाच तिकिटात पीएमपी अन् मेट्रोतून प्रवास; चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच
By अजित घस्ते | Published: October 2, 2023 11:22 AM2023-10-02T11:22:23+5:302023-10-02T11:23:04+5:30
घरापासून पीएमपीएलने मेट्रो - तिथून कार्यालय अन् पुन्हा पीएमपीएलने घरी, अशी व्यवस्था झाली तरच खासगी वाहनांचा वापर कमी होईल
पुणे : डिजिटल व्यवहार वाढले पाहिजेत, अशी पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. जगात सगळ्यात जास्त डिजिटल व्यवहार आज भारतात होत आहेत. परंतु, पीएमपीएल या डिजिटल व्यवहारात मागे आहे. त्यामुळे पीएमपी आणि मेट्रो यांची तिकीट यंत्रणा एकत्र करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत पीएमपीएमएलमध्ये रविवारपासून क्यूआर कोड म्हणजेच गुगल पे तिकीट यंत्रणा सुरू केली आहे. या सेवेचा शुभारंभ कोथरूड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रतापसिंह, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार पवार, माजी नगरसेवक गणेश वरपे, नवनाथ जाधव, अजय मारणे, किरण दगडे-पाटील, अल्पना वरपे, नितीन शिंदे, वैभव मुरकुटे, मंदार जोशी इ. उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘पीएमपीएलची यंत्रणा इतकी सक्षम व्हावी की लोकांना खासगी वाहनाचा वापरच करावा लागू नये. घरापासून पीएमपीएलने मेट्रो स्टेशन, तिथून मेट्रोेने कार्यालय अन् पुन्हा पीएमपीएलने घरी, अशी व्यवस्था झाली तरच खासगी वाहनांचा वापर कमी होईल.’
कर्मचारी समाधानी राहिले तरच संस्था सक्षम राहते. त्यामुळे पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. यातून एक चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहील, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सचिन्द्र प्रतापसिंह म्हणाले की, ‘गेल्या तीन महिन्यापासून पीएमपीएमएल नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी बरेच प्रयत्न करीत आहे. या कार्यक्रमाचे पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार पवार यांनी प्रास्ताविक केले.
गुगल सांगणार बसची वेळ
तुमची बस स्थानकावर नेमकी किती वाजता येणार आहे, याची माहिती मिळण्यासाठी पीएमपीएल गुगल ॲप तयार करत आहे. त्यावर बसची नेमकी वेळ कळेल. त्यामुळे स्थानकावर विनाकारण गर्दी कमी होईल आणि नागरिकांसाठी प्रवास सुलभ होईल. अशी सुविधा येत्या काळात लवकरच सुरू कण्याचा पीएमपीचा मानस आहे.