अत्याधुनिक यंत्रणा तरीही तपास कुचकामी
By admin | Published: May 7, 2017 03:01 AM2017-05-07T03:01:25+5:302017-05-07T03:01:25+5:30
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळते, चोरी करणारे चोरटे त्यात दिसतात, गुन्ह्यातील फरार आरोपीचे मोबाईल जीपीएसच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळते, चोरी करणारे चोरटे त्यात दिसतात, गुन्ह्यातील फरार आरोपीचे मोबाईल जीपीएसच्या आधारे लोकेशन कळते, मोबाईल कॉल रेकॉर्ड मागविल्यावर गुन्ह्याबाबतचे आरोपीचे संभाषण काय झाले, कधी झाले, हे सर्व समजते. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलिसांकडे उपलब्ध असलेली अत्याधुनिक यंत्रणा गुन्ह्याच्या तपासकामी कुचकामी ठरू लागली आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कुमार देवमहाराज आत्महत्या प्रकरण, त्या पाठोपाठ घडलेले तुकाराम चव्हाण आत्महत्या प्रकरण याचे पुढे काय झाले? हे प्रश्न नागरिकांच्या दृष्टीने अनुत्तरित आहेत.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी ही प्रकरणे काय आहेत, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करता येईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र उर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. पोलिसांना मोाबईल कॉल रेकॉर्ड मिळाले होते. देवस्थानच्या विश्स्वतांपैकी आणि देव परिवारातील कोणी या घटनेचा पाठपुरावा केला नाही. म्हणून पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला. परंतु, राज्यात प्रसिद्ध असलेल्या देवस्थानच्या विश्वस्ताने आत्महत्या का केली? हा प्रश्न नागरिकांना अद्यापही सतावत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे निवेदने, तक्रारी देऊन देवस्थानचे विश्वस्त स्वर्गीय देव यांना जेरीस आणले होते. त्यांच्या कारभाराची तसेच देवस्थानच्या जमिनीच्या खेरदी-विक्री व्यवहारासंबंधी वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविली जात होती. त्यामुळे ते त्रस्त होते.
धर्मादाय आयुक्तांकडे देवस्थानच्या व्यवहाराची माहिती मागविणाऱ्या तुकाराम चव्हाण या माहिती अधिकार कार्यकर्त्यानेही देव यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर लोणीकंद येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या दोन्ही घटनांचे एकमेकांशी काही ना काही संबंध असताना, पोलिसांनी सखोल चौकशीची तसदी घेतली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांची खंत : अपेक्षित वेळेत नाही तपास
पोलीस खात्यात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. अनेक आयटी अभियंते पोलिसांना तपास कामात तांत्रिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डच्या आधारे तसेच अत्याधुनिक यंत्रणेचा अन्य पद्धतीने उपयोग करून पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. मात्र, पोलिसांकडून या यंत्रणेचा अवलंब करून नागरिकांना अपेक्षित असलेल्या वेळेत तपास होत नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.