दौंड रेल्वेस्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:06 PM2018-08-21T23:06:10+5:302018-08-21T23:06:50+5:30
फलाट व परिसर स्वच्छ; विविध समस्या लवकरच सोडविणार
दौंड : दौंड रेल्वेस्थानकातून मोठ्या प्रमाणात गाड्यांचे आवागमन सुरू असते. परिणामी स्थानकाच्या अस्वच्छतेची मोठी समस्या निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर तीन अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून स्थानकाची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक सेमुएल किल्फटन यांनी दिली.
दौंड रेल्वे स्थानकातून दैनंदिन ११ हजार, तर महिन्याभरात साधारणत: अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची वर्दळ पाहता रेल्वेस्थानक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असते. परिणामी प्रवाशांचे तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला हानीकारक परिस्थिती निर्माण होते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून संबंधित नवीन यंत्रे आणण्यात आली आहेत.
अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीने सर्व फलाट आणि परिसर स्वच्छ केला जात आहे. दौंड रेल्वे स्थानकातून दररोज ८० रेल्वे गाड्या धावतात; पैकी ५० गाड्यांना रेल्वे स्थानकामध्ये ५ मिनीट थांबा आहे, तर ३० रेल्वे गाड्यांना २० मिनिटांचा थांबा आहे. एकंदरीत दौंड रेल्वे स्थानकाची मोठी व्याप्ती पाहता हे रेल्वे स्थानक स्वच्छ राहावे म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे किल्फटन यांनी स्पष्ट केले.
स्थानकाच्या स्वच्छतेसाठी ४० कामगार सकाळी आणि २० कामगार रात्रीच्या वेळेत काम करतात.
तीन सुपरवायझर देखरेखीसाठी आहेत.
रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृहात महिला प्रवासीवर्गासाठी स्वतंत्र स्तनपान विभाग सुरू केला आहे.
रेल्वे महिला कर्मचाºयांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र रूम कार्यरत झाली आहे.