ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षा मिळतेय अधिक ‘डिमांड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:14+5:302021-07-12T04:08:14+5:30

सध्या ज्वारीचे प्रति क्विंटल ४५००, तर गव्हाचे २९०० रुपये प्रति क्विंटल दर (स्टार ९०६ डमी) पुणे : एकेकाळी गरिबांच्या ...

Sorghum wealth increased; More 'demand' than wheat | ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षा मिळतेय अधिक ‘डिमांड’

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षा मिळतेय अधिक ‘डिमांड’

Next

सध्या ज्वारीचे प्रति क्विंटल ४५००, तर गव्हाचे २९०० रुपये प्रति क्विंटल दर

(स्टार ९०६ डमी)

पुणे : एकेकाळी गरिबांच्या घरातील प्रमुख अन्न म्हणून ज्वारीच्या भाकरीकडे पाहायले जायचे. मात्र, अलीकडील काही वर्षांत राज्यातील शेतकरी गहू, ऊस आणि इतर भाजीपाल्याच्या पिकाकडे वळला आहे. त्यामुळे हायब्रीड आणि मालदांडी ज्वारीचे उत्पादन क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. तर गेल्या काही वर्षांत गव्हाचे उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात देखील वाढले आहे. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीचे प्रति क्विंटल दर वाढले आहे.

सध्या ज्वारीचे प्रति क्विंटल ४०००-४५००, तर गव्हाचे २१००- २९०० रुपये प्रति क्विंटल दर आहेत. पूर्वी ज्वारी गरिबांचे धान्य समजले जायचे. तर गहू फक्त सणासुदीला खाल्ला जायचा. त्यावेळी गहू सहज उपलब्ध व्हायचा नाही. त्यामुळे ज्वारीपेक्षा गहू महाग असायचा. आता मात्र चित्र उलटे झाले आहे. गव्हाची जागा ज्वारीने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर)

वर्ष गहू ज्वारी

२०१९ २६००-३२०० ४४००-४९००

२०२० २७५०-३३०० ४६००-५०००

२०२१ २१००-२९०० ४०००-४५००

----

भाकरी परवडायची म्हणून खायचो...

१) पूर्वी आपल्याकडे गव्हाचे उत्पादन व्हायचे नाही. आपल्याला गहू इतर राज्यातून मागवावा लागायचा. त्याचा वाहतूक खर्च जास्त यायचा. त्यामुळे गहू विकत घेऊन खायला परवडायचा नाही. बाजरी, ज्वारीचे उत्पादन तेव्हा आपल्याकडे घरागणीस व्हायचे. त्यामुळे ज्वारीची भाकरी परवडत होती.

- अर्जुन कदम, वृद्ध शेतकरी

---

२) पारंपरिक पद्धतीने आपण ज्वारी आणि बाजरी पिकाचे उत्पादन घ्यायचो. घरीच उत्पादन होत असायचे आणि जात्यावर दळायचो. त्यामुळे अनावश्यक खर्च होत नसायचा. त्यामुळे रोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी असायची.

- नारायण ठोंबरे, वृद्ध शेतकरी

----

आता चपातीच परवडते...

१) गव्हाचे उत्पादन जास्त होत असल्याने त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग, शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डब्याला चपाती दिली जात आहे. तर ज्वारीचे भाव वाढल्याने आता कधीतरीच ज्वारीची भाकरी केली जाते.

- अविनाश खुर्पे, तरुण

---

१) गव्हाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. सकाळी चहाबरोबर चपाती तसेच दुपारच्या डब्ब्यासाठी देखील आम्ही चपातीच करतो. त्यामुळे आमच्याकडे रोजच्या जेवणात चपातीलाच प्राधान्य दिले जाते. तर कधीतरी मांसाहार असेल तेव्हाच ज्वारीची भाकरी केली जाते.

- सतीश कदम, तरुण

----

कोट

ज्वारी ही ग्लुटेन फ्री असून ज्यांना ग्लुटेन पचायला त्रास असतो किंवा sensitivity असते त्यांना ज्वारी पचायला जास्त सोपी असते. ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर असे इतर क्षार असतात त्यामुळे ज्वारी पौष्टिक दृष्टीने गव्हाच्या पोळीपेक्षा जास्त चांगल्या असतात. जास्त तंतुमय पदार्थ असल्याने रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल कंट्रोल होण्यासाठी ज्वारीचा फायदा होतो. तथापि, ज्वारीच्या अनेक जाती असतात आणि त्यातील काही ज्वारीचे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे काही जणांना ज्वारीने शुगर वाढू शकते आणि त्यामुळे ज्वारी, बाजरी आणि नाचणी एकत्र घेतल्यास जास्त फायदेशीर होऊ शकते.

- अर्चना रायरीकर, आहार तज्ज्ञ

----

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले

वेळेवर पाऊस पडत नाही. त्यातच लष्करी आळी, चिकटा, मावा, यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव सातत्याने होत असल्याने ज्वारीची पाने काळी पडत आहेत. यावर औषध फवारणी केली तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे दरवर्षी ज्वारीचे उत्पादन घटत आहे. राज्यात दरवर्षी साधरण १९ ते २० लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. त्यातून जवळपास १६ लाख हेक्टर उत्पादन निघत आहे. मात्र, यात पुणे जिल्ह्यातील ज्वारीचे उत्पादनात दरवर्षी घट होत आहे.

Web Title: Sorghum wealth increased; More 'demand' than wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.