सॉरी, सरोदे मावशी! बेड न मिळाल्याने पुण्यात वयोवृद्ध महिलेने घरीच घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:59 AM2021-04-06T00:59:05+5:302021-04-06T01:00:23+5:30
कुठेतरी ऍडमिट करा अशी विनवणी करणाऱ्या मावशींना बेड मिळावा म्हणून २४ तास प्रयत्न केले मात्र पदरी निराशाच आली.
पुणे : वय वर्ष ७७़ मधुमेह, रक्तदाबाचा त्रास, एक ह्दयविकाराचा झटका येऊन गेलेला. अशा महिलेला कोरोनाची लागण झाली. तब्बल एक दिवस घरातील लोक तसेच सामाजिक कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी सोमवारी दुपारी त्यांनी घरातच शेवटचा श्वास घेतला. आपल्याला कुठे तरी अॅडमिट करा अशी विनवणी करणार्या मावशीसाठी आपण काही करु शकलो नाही, हतबलतेतून कार्यकर्त्यांनी सॉरी सरोदे मावशी असा संदेश व्हॉटसअॅपवर टाकला. त्यातून या ज्येष्ठ महिलेला शेवटच्या क्षणी झालेल्या यातना वाचून जनवाडी परिसर हेलावून गेला.
शकुंतला बबन सरोदे (वय ७७, रा. हनुमान मंदिराशेजारी, जनवाडी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे चिरंजीव संजय सरोदे यांनी सांगितले की मी माझा भाऊ व आमच्या दोघांच्या पत्नी, मुले एकत्र राहतो. आई घरीच असायची. सकाळी फक्त व्यायामासाठी फिरायला जात असे. दोन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यानुसार रविवारी त्यांची चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने महापालिकेच्या संपर्क क्रमांकावर बेडसाठी प्रयत्न केले. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातही काहींनी जाऊन कोठे बेड उपलब्ध आहे का याची चौकशी केली. मात्र, कोठेही बेड मिळू शकला नाही. सोमवारी सकाळपासून त्यांची तब्येत खालावत गेली. शेवटी दुपारी त्यांची प्राणज्योत मालविली.
याबाबत उमेश वाघ यांनी सांगितले की, सरोदे मावशी यांना बेड मिळावा, यासाठी या भागातील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. परंतु, आम्हाला अपयश आले. त्यांच्या यातना आणि कुटुंबियांची हतबल झालेली परिस्थिती आम्ही थांबवू शकलो नाही.
गेल्या काही दिवसात गोखलेनगर, जनवाडी परिसरात ७५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्याचे आमच्या हाती राहिले.