प्रश्न मार्गी लावा, अन्यथा कामगार मुंडन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:30+5:302021-03-31T04:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कामगारांचे विविध प्रश्न दोन महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन देऊनही हमाल पंचायतीकडून ते पाळण्यात आले नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामगारांचे विविध प्रश्न दोन महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन देऊनही हमाल पंचायतीकडून ते पाळण्यात आले नाही. याविरोधात कामगार सोमनाथ पानसरे यांच्यासह इतर कामगार हमाल भवनसमोर मुंडन करून येत्या मंगळवारपासून (दि. ६) बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.
याबाबत कामगार सोमनाथ पानसरे यांच्यासह इतर कामगारांनी हमाल पंचायतचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना निवेदन दिले आहे. याबाबत पानसरे म्हणाले की, हमाल भवनमधील व्यवस्थापक आणि काही पदाधिकारी एकाधिकारशाहीने वागत कामगारांवर अन्याय करत आहेत. व्यवस्थापकांचे तत्काळ निलंबन करावे. तसेच भुसार बाजारातील कामगार भरतीची चौकशी व्हावी.
ठराविक पदाधिकाऱ्यांकडे असणारी संघटनेची अनेक पदे विभागून द्यावी. पदाधिकारी पदाच्या निवडणुका घ्याव्यात. सर्व कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी डॉ. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिना किंवा दोन महिन्यातून एक बैठक घ्यावी आदी मागण्यांसाठी हमाल भवनसमोर दोन महिन्यापूर्वी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी डॉ. बाबा आढाव यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन येत्या दोन महिन्यांत सर्व प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, ते आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे, असे पानसरे यांनी सांगितले.
चौकट
पठाणांकडून लूट?
“ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव हे कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लढा देत आलेले आहेत. मात्र, पंचायतचे व्यवस्थापक हुसेन पठाण हे वारंवार कामगारांच्या कामकाजात हस्तक्षेप करत सभासद नोंदणी पावतीच्या नावाखाली कामगारांची आर्थिक लूट करीत असून, पैसे द्या मगच काम करा, अशी धमकी देत आहेत,” असा आरोप सोमनाथ पानसरे यांनी केला.