आवाज बंदच! ६१९ दुचाकींचे कर्कश आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर काढले, वाहतूक शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:06 AM2024-04-02T10:06:46+5:302024-04-02T10:07:08+5:30
नागरिकांना अशा पद्धतीने दुचाकीस्वार कर्णकर्कश आवाज करत असल्याचे दिसल्यास पुणे पोलिसांच्या ८०८७२४०४०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे
पुणे : दुचाकीला मॉडिफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढणाऱ्या व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकींवर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेद्वारे ६१९ दुचाकी चालकांनी मॉडिफाइड सायलेन्सर काढून टाकले.
वाहतूक शाखेच्या २७ विभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीचे सायलेन्सर मॉडिफाय करून देणाऱ्या ३१६ जणांवर कारवाई केली. तर दुचाकींचे सायलन्सर मॉडीफाईड करणाऱ्या गॅरेजवाले तसेच मॉडीफाईड सायलन्सर विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांना अशा पद्धतीने दुचाकीस्वार कर्णकर्कश आवाज करत असल्याचे दिसल्यास पुणेपोलिसांच्या ८०८७२४०४०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
शहरात येथे केली कारवाई
फरासखाना १८, विश्रामबाग ४, खडक ८, स्वारगेट १३, सहकारनगर ७, भारती विद्यापीठ ३७, सिंहगड रोड २९, दत्तवाडी १६, वारजे १६, कोथरूड १७, डेक्कन २१, लोणीकंद २०, समर्थ १२, बंडगार्डन १२, लष्कर ६, वानवडी २१, कोंढवा २५, हांडेवाडी ३३, हडपसर ४४, मुंढवा ८५ व लोणी काळभोर १० अशा कारवाया या विभागांमध्ये करण्यात आल्या.