पुण्यात डीजेबंदीनंतरही ध्वनीप्रदुषण झालेच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 08:48 PM2018-09-24T20:48:52+5:302018-09-24T20:57:18+5:30
लक्ष्मी रस्त्यावर डीजेचा थरार कमी झाला तरी ध्वनी प्रदुषणाची पातळी जवळपास तेवढीच राहिली. डीजे बंदीमुळे यंदा ध्वनीप्रदुषणाबाबत उत्सुकता होती.
पुणे : मुख्य विसर्जन मिरवणुक मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर डीजेचा थरार कमी झाला तरी ध्वनी प्रदुषणाची पातळी जवळपास तेवढीच राहिली. ढोल-ताशाच्या गजराने मागील वषीर्चीच ध्वनीपातळी गाठली. त्यामुळे डीजेवर बंदी घातल्यानंतरही पुणेकरांना ध्वनीप्रदुषणाला सामोरे जावे लागले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील चौकांमध्ये ध्वनीपातळी मोजली जाते. यंदाही दहा चौकांमध्ये रविवारी दुपारी १२, ४ व रात्री ८ वाजता आणि सोमवारी मध्यरात्री १२, पहाटे ४ आणि सकाळी ८ वाजता नोंदी घेण्यात आल्या. त्यामुळे ध्वनीपातळीच्या पातळीत किंचित घट झाल्याचे दिसून आले. सर्व चौकांमध्ये दोन्ही दिवस सरासरी ९०.४ डेसिबलची नोंद झाली. मानाच्या गणेश मंडळांसह अनेक मंडळांनीही पांरपारिक वाद्यांना प्राधान्य दिले. ढोल-ताशे आणि झांज पथके यांच्या एकत्रित आवर्तनाने आवाज उंचावला होता. विशेषत: रात्री बारा वाजता ध्वनीपातळी अधिक नोंदविली गेली. पारंपरिक वाद्यांमुळे आवाज तितकाच असला तरी डीजेमुळे होणारा थरा आणि जाणविणारी धडधड मात्र कमी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासही कमी झाला.
महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश पवार, सतीश सुखबोटलावार, सुदेश राठोड, पंकज घोगरे, तुषार राठोड, आकाश रघतवान, वैभव नरवाडे, केतन साखरे, तुषार वाघीरे, विशाल भास्करे, सुदर्शन बध्दमवाड, जगन मोकमोड, प्रदीप तिडके, अनिकेत गजभिये, स्वप्नील धुलेवार, ओंकार कामाजी, मुरली कुंभारकर व प्रवीण शिवपुजे या विद्यार्थ्यांनी ही निरीक्षणे नोंदविली.
--------------------
डीजे बंदीमुळे यंदा ध्वनीप्रदुषणाबाबत उत्सुकता होती. ध्वनीपातळी कमी असेल अशी अपेक्षा होती. पण जवळपास तेवढीच पातळी नोंदविली गेली. पण केवळ ढोल-ताशा असल्याने आवाजाची पातळी कमी-अधिक होती. डीजेचा थरार मात्र कमी झाल्याने दिलासा मिळाला.
- डॉ. महेश शिंदीकर, समन्वयक
-------------
ध्वनीपातळी शंभरीच्या पुढे
लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत काही चौकांमध्ये ध्वनीपातळी शंभर डेसिबलच्या पुढे गेल्याचे आढळून आले. दुपारी १२ वाजता लिंबराज महाराज चौकात सर्वाधिक ११४.३ डेसिबलची नोंद झाली. दुपारी ४ वाजता याच चौकासह कुंटे चौक व शेडगे विठोबा चौकात अनुक्रमे १०५, १०३.१ व १००.४ डेसिबलची नोंद झाली. विशेष म्हणजे या वेळेत सर्व ढोल-ताशा पथके मार्गावर होती. त्यामुळे त्यांचा आवाजही काहीवेळा तीव्र झाल्याचे जाणवले. मागील वर्षी ध्वनीपातळी सरासरी ९०.९ डेसिबलपर्यंत नोंदविली गेली होती. यंदा त्यामध्ये किंचित घट झाली.