पुणेकरांच्या हॉर्नचा आव्वाज मोठ्ठाच.. औषधाला सुध्दा संयम नाही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:47 PM2018-09-11T19:47:04+5:302018-09-11T19:55:53+5:30
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले.
पुणे : चौकात सिग्नलचा हिरवा दिवा लागला की लगेचच पुढे जाण्याची घाई करणारे वाहनचालक हॉर्नची जणु आतषबाजी करतात. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे नो हॉर्न डे दिवशी वाहनचालक किती संयम दाखविणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतुक पोलिसांच्या वतीने बुधवारी (दि. १२) शहरात नो हॉर्न डे साजरा केला जाणार आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरामध्ये ध्वनी प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामध्ये वाहनांच्या कणकर्कश हॉर्नचा वाटाही मोठा आहे. पुण्यासारख्या शहरात दररोज तब्बल एक कोटीवेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर हॉर्न नॉट ओके प्लीज ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत आज नो हॉर्न डे साजरा केला जात आहे. लोकमतने विविध चौकांमध्ये केलेल्या पाहणीनुसार, वाहनचालकांना रस्त्यावर वाहन चालविताना अजिबात संयम नसल्याचे दिसून आले.
चौकामध्ये सिग्नलचा हिरवा दिवा लागण्यासाठी काही सेकंदांचा वेळ बाकी असताना मागील बाजुस उभे असलेले काही वाहनचालक जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरूवात करतात. तसेच हिरवा दिवा लागला की लगेच पाठीमागुन हॉर्नचा गोंगाट सुरू होतो. चौकातून पुढे जातात वाहनांचा वेग कमी असतो. पण काही वाहनचालक या गर्दीतून पुढे जाण्यासाठी आतूर असल्याचे दिसून आले. पुढे जाताना विनाकारण हॉर्न वाजविला जात होता. त्यामुळे तरूणांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: स्पोर्टस बाईकला महाविद्यालयीन तरूण मोठ्या आवाजाचे मल्टीटोन हॉर्न बसवून रस्त्यावर विनाकारण वाजवत फिरताना दिसले. रस्त्यावर तुरळक वाहने असतानाही वाहनचालक संयम ठेवत नाहीत. पुढील वाहन ओलांडून पुढे जाण्यासाठी अनेक जण आतुर असतात. त्यांच्या हॉर्न वाजविण्याच्या चित्रविचित्र पध्दतीवरून तेच दिसत होते. रस्त्यावर वाहनांची रांग लागल्याचे दिसत असतानाही वाहनचालक जाणीवपुर्वक हॉर्न वाजवित असल्याचेही पाहायला मिळाले.
..............
पर्यावरण विभागाच्या दि. ३१ जुलै २०१४ ची अधिसुचनेतील मानके -
राज्यातील वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या हॉर्न्स, सायरन्स आणि मल्टीटोन हॉर्न्स यासाठीची मानके व त्याचा वापर या अधिसुचनेद्वारे निश्चित केली आहेत.
१. सायरन्स किंवा मल्टीटोन हॉर्न्सचा वापर यापुढेही पोलिस व्हॅन्स, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सोडून इतर वाहनांसाठी प्रतिबंधित असेल.
२. शांतता क्षेत्रामध्ये आणि रहिवाशी क्षेत्रामध्ये, रात्री केवळ तातडीच्या प्रसंगा व्यतिरिक्त इतर वेळी प्रतिबंधित असेल. पोलिस व्हॅन, रुग्णवाहिका व अग्शिमन यांनाही हा नियम लागु असेल.
३. प्रत्येक वाहनांसाठी त्या वाहनांच्या प्रकारानुसार, पर्यावरण नियमामध्ये ठरवून दिलेल्या इंजिनाच्या ध्वनी पातळीपेक्षा १० डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी मर्यादा उल्लंघन न करणारे हॉर्न्स, ज्यामध्ये सायरन्स किंवा मल्टीटोन हॉर्न्स बसविणे बंधनकारक आहे.
४. हॉर्न बसविताना तो वाहनाच्या बॉनेटखाली असावा.
५. स्थानिक स्वराज्य संस्थांनी जाहीर केलेल्या शांतता क्षेत्रामध्ये वाहनांचा भोंगा वाजविणे निषिध्द असेल.
--------------------------
बहुतेक सर्व हॉर्नचा आवाज ८० डेसिबलच्या वर असतो. हा आवाज जर सतत कानावर पडत गेला तर कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. सुमारे १०० किंवा त्यापेक्षा जास्त डेसिबल क्षमतेचा हॉर्न सतत वाजत नाही. एकदा वाजून बंद होतो. त्यामुळे त्याचा तेवढा परिणाम होत नाही. पण मुख्य रस्त्यालगत राहणाºया नागरिकांना हॉर्नच्या आवाजाचा जास्त त्रास होतो. तिथे वाहने जास्त असल्याने दिवसा किंवा रात्री सतत हॉर्न वाजत असतात. वाहतुक पोलिसांना याला जास्त सामोरे जावे लागते. तसेच हॉर्नच्या आवाजाने मन सतत विचलित होते. तसेच चिडचिडेपणा वाढणे, कामात लक्ष न लागणे, काम पुर्ण करता न येणे अशी लक्षणे आढळतात.
डॉ. समीर जोशी,
कान, नाक, घसा विभाग प्रमुख, ससुन रुग्णालय
...................
मानसिकता बदलायला हवी
विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अधिक आहे. हॉर्न वाजविल्यामुळे आपण इच्छित ठिकाणी लवकर पोहचू, ही मानसिकता असते. पण त्या वेळेत फारसा फरक पडत नाही. उलट मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदुषण होते. त्यामुळे वाहनचालकांची ही मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी ह्यनो हॉर्न डेह्णमध्ये सहभागी होऊन जागृती करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी व वाहतुक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नागनाथ वाकुडे यांनी केले आहे.