टिमक्यांचा आवाज बसला, धुळवडीचाही रंग ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:49+5:302021-03-26T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वर्षभर कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. व्यवसायाला आलेली मरगळ यंदाच्या होळीत जळून खाक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वर्षभर कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. व्यवसायाला आलेली मरगळ यंदाच्या होळीत जळून खाक होईल असे वाटले होते. मात्र या वर्षी धंदा होईल अशी अपेक्षा असतानाच होळी आणि धूलिवंदन सणावर निर्बंध घालणारा सरकारी आदेश आल्याने किरकोळ विक्रेत्यांची स्वप्ने काळवंडली आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचेही आर्थिक गणित बिघडणार असल्याची खंत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
रविवारी होळी (दि. २८) आणि सोमवारी (दि. २९) धुळवड आहे. होळीला टिमक्या आणि गोवऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. धुळवडीला पिचकाऱ्या आणि रंगांच्या विक्रीला उठाव येतो. या दोन्ही सणांना वेगवेगळ्या खाद्यपेयांची मागणीही वाढलेली असते. यातून किरकोळ व्यापारी, छोटे दुकानदार यांचा चांगला व्यवसाय होतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही सण यंदा सार्वजनिकरीत्या साजरे न करण्याचा आदेश आला आहे. त्यातच केव्हाही लॉकडाऊन लागू शकतो, अशाही अफवा पसरवल्या जात आहेत.
यामुळे खरेदी केलेल्या मालाची तरी विक्री होणार का, अशी काळजी विक्रेत्यांना आहे. मागच्या वर्षीही मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सार्वजनिक व्यवहार, सण उत्सवांवर गदा आली होती. त्यामुळे अनेकांकडे गेल्या वर्षीचाच माल अजून पडून आहे. त्यात उत्साहाने काहींनी यंदा नव्या मालाची भर टाकली. तर काहींनी नवा माल भरण्याचे टाळले. मागचे पैसे मिळायला ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागल्याने यंदा सावध पावले टाकल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोट
“नेहमीच्या एकूण धंद्याच्या २५ टक्केही धंदा नाही. कोरोनापूर्व दिवसांमध्ये होळीच्या आठवडाभर आधीच रात्री बारापर्यंत दुकान सुरू राहायचे. त्या वेळी कोटभर रुपयांचा माल भरत असू. यंदा एका रुपयाचाही माल भरला नाही. मागच्या वर्षी होलसेलचा माल विकला गेला. मात्र किरकोळ विक्रेत्यांचा माल विकला गेलाच नाही. त्यामुळे बिले मिळायला वेळ लागला. यंदा भाव तोडून विकला तरी माल जात नाही, अशी परिस्थिती आहे.”
-अशोककुमार सारडा, व्यापारी.
कोट
“दोन दिवसांपूर्वीपर्यंत परिस्थिती चांगली होती. आदेश काढल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. हंगामी धंदा करणाऱ्यांवर तसेच रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. दरवर्षी होलसेल व्यापारी ५० ते ८० लाखांपर्यंत माल भरतात. यंदा मात्र २५ ते ३० टक्केच धंदा आहे. परगावचे, जिल्ह्याबाहेरचे तसेच उपनगरातील दुकानदार पुण्यात माल घ्यायला फिरकलेलेच नाहीत. शहरात होळी, धुळवडीचे साहित्य विकणारे शहरात १२ ते १३ होलसेल व्यापारी आहेत.”
- सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन.
चौकट
पारंपरिक चामड्याच्या टिमकीची मागणी फारच कमी झाली आहे. प्लॅस्टिकच्या टिमकीला (ताश्याला) आता उठाव आहे. चमड्याची टिमकी ७० ते ८० रुपयांना मिळते. तर ताश्याची किंमत ३०-३५ रुपये आहे. यंदा सार्वजनिक होळी साजरी करण्यावर मर्यादा असल्या तरी वैयक्तिक स्वरूपात होळी आनंदाने साजरी करणार असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे गोवऱ्या, पूजा साहित्याच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नसल्याचीही आशा विक्रेत्यांना आहे.