चांगला नफा मिळवण्याच्या नाद; पतीच्या बँक खात्यातून काढले तब्बल साडेचार लाख, सायबर चोरट्यांनी गंडवले
By भाग्यश्री गिलडा | Published: February 29, 2024 03:02 PM2024-02-29T15:02:47+5:302024-02-29T15:03:25+5:30
अनोळखी व्हाट्स अँप ग्रुपवर येणाऱ्या बिटकॉइनच्या मेसेजच्या नादात गमावले पतीचे पैसे
पुणे: बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल आणि चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २८) तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केशवनगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार ८ जानेवारी २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला आहे. महिलेला व्हॅट्सऍपवर एका अनोळखी ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक पैसा मिळतो, असे ग्रुपमधील चर्चेवरून महिलेच्या लक्षात आले. तशाच आशयाचे स्क्रिनशॉट आणि व्हॉइस नोट्स त्या ग्रुपमध्ये येत होते. त्यावर विश्वास बसल्याने महिलेने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातील काही टास्क पूर्ण करण्यास सांगून नफा दिला आणि वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार महिलेला आणखी पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. महिलेने पतीच्या खात्यातून ६ लाख ४३ हजार रुपये भरले. वेबसाईटवर नफा मिळतो आहे असे दिसत होते मात्र प्रत्यक्ष पैसे काढण्यासाठी प्रयत्न केला असता पैसे निघत नसल्याने महिलेने विचारणा केली. प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.