वारी अखंड ऊर्जेचा स्रोत
By admin | Published: June 19, 2017 05:20 AM2017-06-19T05:20:34+5:302017-06-19T05:20:34+5:30
वर्षानुवर्षे अखंडपणे ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा
पुणे : वर्षानुवर्षे अखंडपणे ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा आणि आता नातू अशी वारीत सहभागी होण्याची परंपरा जपत भागवत धर्माची पताका उंचाविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. आषाढी वारी ही अखंड ऊर्जेचा स्रोत असून त्यातून जगण्यासाठी खूप काही मिळत असल्याची भावना वारकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता असते, असे वारकरी कधीच ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण आम्हाला विठूरायाला भेटायचे असते... आमच्या मधले काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो, या वारीतच असे मला वाटते. गेली २२ वर्षे विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहे. माऊली भेटीची ओढ लागली असल्यामुळे आमची तहान, भूकदेखील हरते. फक्त हरिनामाचा गजर करत विठूच्या भेटीस चालतो.
- भीमराव करपे (वय ६०)आम्हाला जशी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस आहे, तशीच वरुणराजाच्या दर्शनाचीही आस असून, महाराष्ट्राला दुष्काळाच्या सावटातून मुक्त कर, असे साकडे विठ्ठलाला घालणार आहोत. मराठवाड्यात चांगला पाऊस होऊ दे आणि आमची सगळी संकटे टळू दे यासाठी आम्ही देवाला विनवणी करायला पंढरपूरला चाललो आहोत. आम्ही १५ वर्षे झाली वारीला जात आहोत. दुथडी भरून वाहणारी नीरा नदी आणि माउलींच्या सान्निध्यात होत असलेले पवित्र तीर्थस्नान हा आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे. संतांबरोबर तीर्थस्नानाचे भाग्य आहेच; पण माउलींच्या पादुका हातात घेउन नदीत स्नान करतानाचा क्षण आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. - अक्काबाई गवारे मी वयाच्या १० व्या वर्षापासून वारीमध्ये सहभागी आहे. गेली सहा वर्षे मी सातत्याने वारकरी संप्रदायसोबत विठूरायाच्या दर्शनास जातो. माझे सर्व कुटुंबच या वारीमध्ये सहभागी असते. आम्ही दिवसा लवकर उठून शुचिर्भूत होऊन अभंग म्हणत म्हणत पंढरीच्या वाटेवरती चालू लागतो, दुपारनंतर पोटपूजा आटोपून रस्त्याच्या कडच्या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावयाची व पुन्हा चालणे सुरू करायचे. एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी सगळे भक्तगण गोळा होतात आणि उभे किंवा वतुर्ळाकार रिंगण तयार केले जाते. तसेच पालखी, ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्याभोवती वतुर्ळाकारात उभे राहतात किंवा दोन समांतर ओळीत उभे राहातो. तेव्हा त्या रिंगणात रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. त्यानंतर अंधार पडला की जवळपासच्या गावी किंवा वस्तीवर मुक्काम करायचा, असे आम्हा वारकऱ्यांच्या प्रवासाचे स्वरूप असते.
- ग्यानोबा पांचाळ (वय १६)पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी, या नामघोषाने आमच्या वारीला सुरुवात होते. यामुळे सगळे वातावरण भारून जाते. चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका "
या समर्पक ओवीच्या अविर्भावात आमच्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता आम्ही सारे वारकरी दिंडीबरोबर चालत रहातो. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांचा पंढरपूरला पायी चालत जाण्याचा मार्ग भिन्न आहे. परंतु पुण्यात मात्र या दोन्ही पालख्या एकाच दिवशी येतात आणि पुणे शहरही विठूनामाच्या गजराने दुमदुमून निघते. तसेच या पालखीसोबत आम्ही पुढे पंढरपूरच्या मार्गी लागतो. गावोगावी वरून येणाऱ्या आमच्या या वारकरी दिंड्यांचे त्या त्या गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांकडून भव्य स्वागत होते.
- बाळू जाधव