विद्यार्थिनींकडून सदर्न कमांडच्या जवानांना रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:51 AM2018-08-27T02:51:23+5:302018-08-27T02:51:40+5:30
लोकमत, इरा फाउंडेशनचा उपक्रम : शाळांमध्ये राखीनिर्मिती कार्यशाळा
पुणे : लोकमत आणि इरा फाउंडेशनतर्फे आयोजित रक्षाबंधननिमित्त पुण्यातील काही शाळांमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या विशेष उपक्रमांतर्गत लहानग्यांनी आपल्या हातांनी राख्या बनविल्या. या सर्व राख्या शनिवारी (दि. २५) सदर्न कमांड सिग्नल रेजिमेंट येथील जवानांना लोकमत कॅम्पस क्लब, सखी मंच समन्वयिका आणि रोझरी शाळेच्या मुलींनी बांधल्या.
देशात विविध सण व उत्सव साजरे होत असताना सीमेवर लढणारे जवान मात्र या वेळी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची बाजी लावत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळा उपक्रमात अग्रेसन विद्यालय, आनंद निकेतन विद्यालय, इंडियन एज्युकेशन विद्यालय, राठी स्कूल, महेश विद्यालय, विझडम विद्यालय, ज्ञानअंकुर विद्यालय, सुंदराबाई मराठे विद्यालय, आकाश इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. जवानांसाठी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी असलेल्या या विशेष कार्यक्रमावेळी रोजरी ग्रुपचे विनय अºहाना, खत्री बंधू पॉट आयस्क्रीमचे गिरीश खत्री आदी उपस्थित होते.
देशाच्या जवानांसाठी लोकमतसोबत काम करायला मिळाले. जवानांना आपले कर्तव्य बजावत असताना रक्षाबंधनासारख्या सणांनाही मुकावे लागते. या उपक्रमामुळे जवानांच्याही आनंदात भर पडली. - सीमा चव्हाण,
संचालिका, इरा फाउंडेशन लोकमतसोबत नेहमीच आम्ही विविध उपक्रमांत सहभागी असतो. परंतु या विशेष उपक्रमात सहभागी होताना गर्वाचा अनुभव झाला. जवान देशाच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात; परंतु त्यांच्यासाठी काम करायला मिळणे ही आमच्यासाठी पर्वणीच होती. - गिरीश खत्री, संचालक, खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी.
रोझरी ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून लोकमतसोबत आम्ही हा उपक्रम राबवला. यात विद्यार्थ्यांना देशासाठी सेवा करणाऱ्या जवानांसाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद वाटला.
- विनय अºहाना,
संचालक, रोझरी ग्रुप आॅफ एज्युकेशन