Maharashtra Rain: नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला! पाऊस जाता - जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून जाणार
By श्रीकिशन काळे | Published: September 23, 2024 03:22 PM2024-09-23T15:22:10+5:302024-09-23T15:22:43+5:30
दरवर्षी परतीच्या पावसाचा प्रवास हा सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असतो, पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास चांगलाच लांबत चालला आहे
पुणे: राजस्थान व कच्छ परिसरातून वाहणारा वारा आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याने नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. त्याची अधिकृत घोषणा सोमवारी (दि.२३) भारतीय हवामान खात्याने केली. या परतीच्या प्रवासात मध्य भारत व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यंदा हवामान विभागानूसार देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सुमारे १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानूसार देशातील अनेक भागामध्ये सरासरी पावसाची नोंद झाली. दक्षिण भारतामध्ये तर प्रचंड पाऊस झाल्याने पूर स्थिती निर्माण झाली. उत्तरेकडील काही भागात सरासरी पाऊस झाला, तर ईशान्यकडील भागात कमी पावसाची नोंद झाली.
दरवर्षी परतीच्या पावसाचा प्रवास हा सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असतो. पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास चांगलाच लांबत आहे. मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनने माघारी गेला होता. यंदा तो २३ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला निघाला आहे.
गेल्या पाच वर्षांतील परतीचा प्रवास
९ ऑक्टोबर २०१९
२८ सप्टेंबर २०२०
६ ऑक्टोबर २०२१
२० सप्टेंबर २०२२
२५ सप्टेंबर २०२३
२३ सप्टेंबर २०२४
सध्या मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. राजस्थानमधून त्याने काढता पाय घेतला. परंतु, सुरुवातीचे काही दिवस तो जागेवरच रेंगाळण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे २४ सप्टेंबरदरम्यान विदर्भात जोरदार आणि त्यानंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेचा पाऊस होईल. तसेच मुंबईसह कोकण, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ
राज्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट !
राज्यामध्ये पुढील पाच दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चार दिवसांनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस
हडपसर : ३३. ५ मिमी
ढमढेरे : ३१ मिमी
हवेली : २५ मिमी
कोरेगाव पार्क : २३.५ मिमी
दौंड : २२.५ मिमी
वडगावशेरी : २२ मिमी
पाषाण : १९.१ मिमी
लवळे : १८ मिमी
शिवाजीनगर : १७.३ मिमी
एनडीए : १० मिमी
पुरंदर : ८ मिमी
बारामती : ७ मिमी
मगरपट्टा : ७ मिमी