व्हिडीओ क्लिप बनविणाऱ्यांना सुगीचे दिवस
By admin | Published: February 17, 2017 04:26 AM2017-02-17T04:26:50+5:302017-02-17T04:26:50+5:30
वाजंत्र्यांचा ताफा, त्यावर होणारा खर्च, त्याचबरोबर फ्लेक्स बोर्डवर जाहिराती करण्यास मर्यादा आल्याने जिल्हा परिषद
बारामती : वाजंत्र्यांचा ताफा, त्यावर होणारा खर्च, त्याचबरोबर फ्लेक्स बोर्डवर जाहिराती करण्यास मर्यादा आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कमी खर्चात जादा परिणामकारक प्रचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आॅडिओ, व्हिडिओ व्हिज्युअलचे रेकॉर्डिंग करून देणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनाही या प्रकारच्या प्रचाराचा मोह आवरत नाही. त्यामुळे कमी मनुष्यबळात फक्त स्पीकर भोंग्यांद्वारे, पेनड्राइव्हद्वारे प्रचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चातदेखील बचत होत आहे.
या जिल्हा परिषद निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करण्यात कोणीही मागे पडलेले नाही. सध्या तरुणाईसह जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत. त्यामुळे फेसबुक लाईव्ह, व्हॉट्सअॅप व्हिडीओ, व्हॉईस कॉलवर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते भर देत आहेत. या निवडणुकीत सैराटच्या ‘झिंगाट’ गाण्यासह ‘बेबी ब्रिंगी डॉल’, तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या टायटल गाण्याला अधिक पसंती दिली जात आहे.
फ्लेक्स लावण्यावर मर्यादा आल्या आहेत. तसेच त्यासाठी अनेक परवानग्या घ्यावा लागतात. त्यामुळे इंटरनेटच्या युगात ग्रामीण, शहरी भागातदेखील उमेदवारांना मोबाईलवर सहज उपलब्ध होता येत आहे. काही उमेदवार सोशल मीडियाच्या लाईव्ह सुविधेचा वापर करीत आहेत. त्यामुळे थेट मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य झालेले आहे.
या संदर्भात येथील योद्धा प्रॉडक्शनचे नानासाहेब साळवे यांनी सांगितले, की पूर्वीसारखा माईकवर प्रचार करण्यापेक्षा नागरिकांच्या पसंतीला उतरलेल्या गाण्यांचा वापर करून प्रचार केला जातो. तसेच, ढोलताशा पथकाचादेखील समावेश केला जातो.
आता केवळ एका पेनड्राइव्हमध्ये सर्वप्रकारचा प्रचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रकाशकासह प्रसिद्ध केलेल्या पत्रकाचा वापर आॅडिओ, व्हिडीओ क्लिपसाठी आम्ही करतो. त्याचे ध्वनीक्षेपण करण्यासह इतर बाबींची परवानगी घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहते. (वार्ताहर)