जिल्ह्यात १ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:54+5:302021-07-27T04:09:54+5:30
बारामती : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खरिपाच्या सरासरी १ लाख ८४ हजार २७४ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २६ हजार ९९९ हेक्टर ...
बारामती : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खरिपाच्या सरासरी १ लाख ८४ हजार २७४ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २६ हजार ९९९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत १७० टक्के सोयाबीनच्या पेरण्या झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना महिना अखेरीपर्यंत भाताच्या लागवडी पूर्ण कराव्यात असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने केले आहे. मात्र, भातलागवड क्षेत्रामध्ये पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे भात खचरांमध्ये पाणी साठले आहे. तर काही ठिकाणी बांध वाहून गेल्याने भात खचरांचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यामध्ये १ हजार २० मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला होता. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी दोन महिन्यांमध्ये ४३९ मिलिमीटर म्हणजेच ५३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जून महिन्यामध्ये १८६ मिमी तर, जुलैमध्ये २५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर आहे. तर पूर्व भागातील पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर भागामध्ये पाऊस नसला तरी याठिकाणी पावसाने जून, जुलैची सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात भात पिकाचे सरासरी क्षेत्र ६१ हजार हेक्टर असून त्यासाठी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका घेण्यात आलेल्या आहेत. भात लागवडीची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात आजअखेर सर्वसाधारणपणे ७० ते ८० टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे.
जिल्ह्यात मूग पिकाचे सरासरी क्षेत्र १३ हजार ८०० हेक्टर आहे. आजअखेर ९ हजार ५१७ हेक्टर (६९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यानंतर मूग पिकाची पेरणी होणार नाही. सद्यस्थितीत पीक काही ठिकाणी मूग वाढीच्या व काही ठिकाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र १ हजार ५५६ हेक्टर आहे. आतापर्यंत ८८९ हेक्टर (५७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये बाजरी पीक महत्त्वाचे मानले जाते. जिल्ह्यात बाजरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ८ हजार ७६० हेक्टर आहे. आजअखेर २ लाख ५ हजार ८५० हेक्टर (६७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पेरणी झालेले पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
मका पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार १३५ हेक्टर आहे. आजअखेर १ लाख ४ हजार ६१ हेक्टर (८२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सद्यस्थितीत पीक वाढीच्या अवस्थेत असून पिकावर ४३७ हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागामार्फत लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळणेबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ६ हजार ०८९ हेक्टर आहे. आतापर्यंत १ लाख १ हजार ३१ हेक्टर (६९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
सोयाबीनचे क्षेत्र १७० टक्क्यांवर...
यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. सोयाबीन पिकाला बाजारात चांगला दर असल्याने सोयाबीनच्या पेरणीमध्ये वाढ झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार ४८१ हेक्टर असून आजअखेर २ लाख ९ हजार ७८१ हेक्टर (१७० टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सद्यस्थितीत पीक वाढीच्या अवस्थेत असून, इंदापूर व खेड तालुक्यात ७४९ हेक्टर क्षेत्रावर पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागामार्फत पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव टाळणेबाबत उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
------------------------------
जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे भात लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागात क्षेत्रीय स्तरावर पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- ज्ञानेश्वर बोथे, जिल्हा कृषी अधीक्षक, पुणे
-----------------------------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका पाऊस
भोर- ७००
वेल्हे- १,०९६
मुळशी- ९६०
मावळ- १,१०५
हवेली- २८८
खेड- ३७९
आंबेगाव- ४५५
जुन्नर- २९१
शिरूर- १८६
पुरंदर- २२७
दौंड- २०४
बारामती- २२५
इंदापूर- २४२
एकूण- ४३९
------------------------------
प्रमुख पिके व पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भात- २,७,०६४
बाजरी- २,५,८५०
मका- १,४,०६१
सोयाबीन - २,९,७८१
तूर- १,०२५
मूग - ९,५१७
भुईमूग - ११,०३१
मका- १४,०६१