बारामतीत गव्हाच्या नीचांकी पेरण्या
By admin | Published: November 24, 2015 12:45 AM2015-11-24T00:45:50+5:302015-11-24T00:45:50+5:30
यंदाच्या वर्षी घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. बारामती उपविभागामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या केवळ ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत
बारामती : यंदाच्या वर्षी घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. बारामती उपविभागामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या केवळ ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर, गव्हच्या लागवड क्षेत्रात नीचांकी घट झाल्याचे समोर आले आहे. पुरंदर तालुक्यात गव्हाची लागवड करण्यात आलेली नाही, तर आलेले पीक पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहे.
बारामती उपविभागामध्ये बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांचा समावेश होतो. या चारही तालुक्यांमध्ये यंदा सरासरीएवढ्या रब्बीच्या पेरण्या झालेल्या नाहीत. ढगाळ हवामान, थंडीचा अभाव, पाण्याची कमतरता यांमुळे गव्हाचे क्षेत्र तुरळक प्रमाणातच दिसत असल्याचे चित्र आहे. बारामती तालुक्यात गव्हाच्या केवळ ४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्याखालोखाल इंदापूरमध्ये ३ टक्के, दौंडमध्ये १ टक्का, तर पुरंदरमध्ये चक्क ‘०’ टक्का क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. भुसार मालाच्या बाजारपेठेत गव्हाचे स्थान महत्त्वाचे आहे.
यंदाच्या भुसार बाजारपेठेवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. मागणीपेक्षा स्थानिक बाजारपेठेतील गव्हाची उपलब्धता कमी राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे गव्हाचे बाजार यंदा चढे राहण्याची अधिक शक्यता आहे.
बारामती तालुक्यात रब्बीतील ज्वारीच्या केवळ ६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर, दौंड तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ६ टक्के क्षेत्रावरच ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत.
खरिपापाठोपाठ पाण्याअभावी रब्बीही वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर, इंदापूर आणि पुरंदरमध्ये अनुक्रमे १२ व ७३ टक्के क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. रब्बीमध्ये हमखास गव्हाचे पीक घेतले जाते.
(वार्ताहर)