इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 03:23 AM2018-07-11T03:23:44+5:302018-07-11T03:24:08+5:30
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे.
वालचंदनगर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यातही अद्याप पावसाचे थेंब नसल्याने खरिपाच्या पेरणीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. तालुक्यात या वर्षी सरासरी फक्त १० टक्केच खरिपाची पेरणी झालेली असून तेही मकाचे पिके घेण्यात आलेले असल्याने या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन पेरणीआभावी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
तालुक्यात दर वर्षी पाऊस पाठ फिरवत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालवली आहे. विहिरी, विंधनविहिरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ९० टक्के वेळेवर खरीपाची पेरणी झालेली होती. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण होते. या वर्षी हवामान खात्याने आवश्यकतेपेक्षा जास्तच पाऊस पडणार असल्याचे भाकीत करण्यात आलेले असल्याने एप्रिल, मे महिन्यात शेतकºयांनी शेतावर मशागत करून जमिनी पेरणीयोग्य करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पावसाचे आगमन झालेले होते.
त्यामुळे शेतकºयांच्या खरिपाच्या पेरणीच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या होत्या. परंतु जूननंतर पेरणीयोग्य पाऊस पडलाच नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. जुलै महिन्यात पिके खुरपणीला येत असतात. परंतु अजूनही पेरणीच झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरीच्या जोरावर तालुक्यात १० टक्के जनावरांच्या चारापाण्यासाठी मका पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. अन्यथा खरिपाच्या पेरणीची तिफण चाललीच नसल्याने चिंता लागून राहिली आहे.
दररोज डोक्यावर ढगांचे थैमान काळेकुट्ट ढग पाहावयास मिळत आहे. परंतु हुलकावणी देऊन निघून जात असल्याने शेतकºयाने अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत. तालुक्यातील कृषी अधिकारी सूर्यकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या वर्षी या महिन्यात संपूर्ण शंभर टक्के पेरणी करण्यात आलेली होती. उडीद, मूग, सोयाबीन, तूर पिके वंचित राहिली आहेत.