पाऊस नसतानाही पेरणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:40 PM2018-10-03T23:40:39+5:302018-10-03T23:40:53+5:30
पुरंदर तालुका : शेतकऱ्यांवर ओढवणार दुबार पेरणीचे संकट
भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात पावसाने पूर्णत: हुलकावणी दिली आहे. मात्र जमिनीत पुरेशी ओल नसतानाही रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक वाया जाऊ नये, म्हणून शेतकºयांनी पेरणी सुरू केली आहे. मात्र, पावसाअभावी पेरणी केलेल्या ज्वारीची उगवण व्यवस्थित होत नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणीची कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जात आहे. कृषी विभागही या हंगामात ठराविक शेतकºयांच्या शेतात ज्वारीची पेरणी करून बी तयार करतात. श्रावण महिना संपला, की ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला. बाजरीच्या पिकाला तालुका मुकला. खरीप हंगाम जरी वाया गेला असला तरी याची भर रब्बी हंगाम भरून काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिली. पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी कोरडीलाच पेरणी करत आहे. मुसळधार पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. सध्या पाऊस परतीच्या प्रवासाला निघाला आहे. किती प्रमाणात तो होईल, याची शाश्वती देता येत नाही.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी येते. शेतकरी पैसे भरून पाणी घेतात. गावाजवळील ओढे-नाले भरून घेतात. यामुळे गावाजवळील विहिरी व बोअरवेल यांना पाणी येते. परंतु पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी हे पुण्याचे सांडपाणी आहे. यामुळे ते स्वच्छ नाही. परंतु दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजाने हे पाणी प्यावे लागते. या भागात पिण्याचे पाणी कसेबसे मिळते. या वर्षात एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. आज-उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकºयाने लागवड केलेल्या शेवंती, झेंडू, कापरी आदी फुलपिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. कांदापिकांच्या लागवडी सुरू झाल्या असून काही शेतकºयांनी पाऊस पडेल, या आशेवर कोरड्यातच कांदा लागवडी केल्या आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
पुरंदर तालुक्यात दरवर्षीच पाऊस कमी पडतो. पावसाच्या आशेवर ज्वारीची पेरणी सुरू आहे. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली असून आठवडाभरात पाऊस न झाल्यास ज्वारीच्या पिकावर मोठा परिणाम होऊन ज्वारीचे उत्पादन घटणार आहे.
- सुरेश जगताप, शेतकरी