सोयाबीनवर चक्रीभूंगा खोडमाशीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:38+5:302021-09-09T04:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोयाबीनच्या दरात एकदम वाढ झाल्याने जिल्ह्यात यंदा तब्बल ३६ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोयाबीनच्या दरात एकदम वाढ झाल्याने जिल्ह्यात यंदा तब्बल ३६ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापैकी २ हजार हेक्टर क्षेत्रावर चक्रीभूंगा व अन्य रोग पडल्याने सोयाबीन पेरलेला शेतकरी धास्तावला आहे. कृषी विभागाकडून त्यांना मदत करण्यात येत आहे.
सोयाबीनला साधारण ४ हजार रुपये क्विंटल (१०० किलो) भाव मिळत असे. मागील वर्षी तो एकदम ९ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचला. त्यामुळेच यंदा बहुतेक ठिकाणी सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र कीड लागण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र १० ते १४ हजार हेक्टर असायचे. ते यावर्षी ३६ हजार २१६ हेक्टर म्हणजे दोनपटीहून जास्त झाले आहे. जास्त भावाच्या आशेने शेतक-यांनी मशागत, पेरणी, दर्जेदार बियाणे यासाठी बराच खर्च केला आहे.
चांगला पाऊस व हवामान यामुळे पेरणी झालेल्या सर्वच सोयाबीनची वाढ चांगली आहे. मात्र साधारण २ हजार हेक्टर क्षेत्राला चक्रीभुंगा, खोडमाशी या किडीने ग्रासले आहे. ---///
अशी असते चक्रीभुंग्याची कीड
चक्रीभुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन वरचा भाग वाळून जातो. तर अळी देठ, फांदी, खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते व पूर्ण झाड वाळून जाते.
असा करावा उपाय
चक्रीभुंग्याच्या किडीने अंडी घालू नये याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अन्य कीटकनाशकांच्या वापरासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी, अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
कोट -----
कीड लागू नये यासाठी शेतीक्षेत्राची रोपांची नियमित पाहणी करावी. प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित उपाय करावेत.
- विकास पाटील, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी
ज्वारी व बाजरीचे क्षेत्र घटून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. पिकावर रोग पडल्याने त्यांनी धास्तावून जाऊ नये. कीड नियंत्रणात ठेवण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक