सप महाविद्यालयाचीही वाटचालही विद्यापीठाच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:56 PM2019-02-01T13:56:40+5:302019-02-01T14:09:44+5:30
सप महाविद्यालयाची वाटचाल सरकारच्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्हर्टिकल, क्लस्टर आणि स्वतंत्र महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
पुणे : सप महाविद्यालयाची वाटचाल सरकारच्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्हर्टिकल, क्लस्टर आणि स्वतंत्र महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही प्रकारांबाबत शासनाकडून सविस्तर नियमावली अजून प्राप्त झालेली नाही. ही नियमावली मिळाली की, त्यानुसार स.प महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती शिक्षण प्रसारक नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी दिली.
स.प. महाविद्यालयास स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) महाविद्यालयास ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अॅड. जैन यांनी दिली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, प्राचार्य डॉ. दिलिप सेठ उपस्थित होते.
डॉ. जैन यांनी सांगितले, स.प.महाविद्यालयास स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे आहे. त्याचबरोबर नुकताच रूसा अंतर्गत ५ कोटींचा निधी जाहीर झाला आहे. यातून विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रकारे सप महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी अधिकाधिक कशा मिळतील, यासाठी अभ्यासक्रमांची रचना करण्यात येईल. विज्ञान शाखेशिवाय कला आणि वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील, यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञानाबरोबर बाजारपेठेतील घडामोडींची माहिती मिळण्यासाठी आगामी काळात कार्यक्रम व धोरण आखण्यात येतील. रुसाच्या निधीच्या माध्यमातून महाविद्यालयात संशोधन आणि विकासासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स.प महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सभागृहाच्या पुरातन बांधकामात बदल न करता हे नूतनीकरण केले जाणार आहे. नव्या सभागृहात आसन क्षमता वाढविण्यात येणार आहे, त्याचबरोबर वातानुकूलीत यंत्रणा आणि ध्वनी यंत्रणा उभारण्यासोबत सभागृहाला अॅम्पी थिएटरचा लूक देण्यात येईल. नूतनीकरणाचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल असे जैन यांनी सांगितले.
..............
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन
स.प. महाविद्यालयात येत्या रविवारी दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पध्दतीने उद्योजकता व कौशल्य कक्षाचे उदघाटन होणार आहे. देशभरातील २५ शिक्षण संस्थांना रूसाअंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या संस्थांमध्ये उद्योजकता कक्ष स्थापन करण्यासाठी ५० लाखांचा निधीदेखील देण्यात आला आहे. या कक्षांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी श्रीनगर येथून या कक्षाचे उदघाटन करणार आहेत.