वीज केंद्रासाठी जागेची मागणी
By admin | Published: July 6, 2017 03:14 AM2017-07-06T03:14:38+5:302017-07-06T03:14:38+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील देहूरोड बाजारपेठ, विकासनगर मामुर्डी व शितळानगरसह महापालिका हद्दीतील विकासनगर भागातील
लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील देहूरोड बाजारपेठ, विकासनगर मामुर्डी व शितळानगरसह महापालिका हद्दीतील विकासनगर भागातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी वीज उपकेंद्रासाठी हव्या असणाऱ्या जागेचा प्रस्ताव संरक्षण विभागाकडून लवकर मार्गी लागावा़ तसेच सरकारी जागांवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांच्या मिळकतींना कर आकारणी बिले न देण्याबाबत रक्षा संपदा महासंचालकांनी देहूरोड बोर्ड प्रशासनाला दिलेल्या सूचनांबाबत फेरविचार करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सदस्य व नागरिकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले़ भामरे यांनी संबंधित जागा लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केल्याचे बोर्डाच्या अर्थ समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी सांगितले.
देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या देहूरोड बाजारपेठेसह विविध भागांत गेल्या वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरणकडून वीज उपकेंद्राची उभारणी करण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली होती. सदस्य विशाल खंडेलवाल यांच्या पुढाकाराने मांडलेला जागेचा प्रस्ताव बोर्डाने मंजूर करून सरंक्षण विभागाच्या दिल्ली येथील संबंधित वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेला असून, संबंधित जागा लवकर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच गेल्या आठवड्यात रक्षा संपदा महासंचालक जोजेनेश्वर शर्मा यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला भेट दिली. वीज उपकेंद्रासाठी पाठविलेला प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केल्याचे तसेच संबंधित मिळकतींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले आहे.
बैठकीत सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांच्या संबंधित मिळकतींना कराची बिले देणे थांबविण्याबाबत तसेच मिळकतीवरील क्रमांक काढून टाकण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यामुळे संबंधित सूचनांची अंमलबजावणी तूर्त करण्यात येऊ नये, याकरिता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली बोर्डाच्या अर्थ समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू , ललित बालघरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लहू शेलार व अमोल नाईकनवरे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.