‘पीएमपी’साठी जागा; विषय दाखल
By admin | Published: April 21, 2015 02:59 AM2015-04-21T02:59:16+5:302015-04-21T02:59:16+5:30
निगडी, चऱ्होली आणि डुडुळगाव येथील जकात नाक्याच्या जागा पीएमपीला डेपो किंवा स्थानकासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव आज
पिंपरी : निगडी, चऱ्होली आणि डुडुळगाव येथील जकात नाक्याच्या जागा पीएमपीला डेपो किंवा स्थानकासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेत दाखल करून घेतला. सभा तहकूब झाली. पुढील सभा १३ मे रोजी होणार आहे. सभेच्या मान्यतेनंतर डेपोसाठी जागा देण्याचा निर्णय होणार आहे.
अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. पीएमपीकडे सध्या १ हजार ४५० आणि भाडे तत्त्वावरील ६६२ अशा एकूण २ हजार ११२ बस आहेत. त्यांच्या पार्किंगसाठी पुणे महापालिका हद्दीत ७, पिंपरी-चिंचवड हद्दीत ३ असे १० डेपो आहेत. बससंख्येच्या तुलनेत पार्किंगसाठी पीएमपीकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पीएमपीच्या शेकडो बस दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील रस्त्यांवर पार्किंग केल्या जातात. पीएमपीला केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत ५०० गाड्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बस पार्किंगचा प्रश्न वाढणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने विविध जकात नाक्यांच्या मोकळ्या जागा डेपो किंवा स्थानकासाठी देण्याची मागणी केली. या सभेमध्ये भ्रष्ट निवृत्त अधिकाऱ्यांविषयीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. याबाबत काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता होती. परंतु ही सभा तहबूक झाली. (प्रतिनिधी)