वर्षाविहारासाठी झुंबड
By admin | Published: July 17, 2017 04:02 AM2017-07-17T04:02:41+5:302017-07-17T04:02:41+5:30
शनिवार, रविवारची सलग सुटीमुळे पवना धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी करीत वर्षाविहार आणि निसर्गभ्रमणाचा आनंद लुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
येळसे : शनिवार, रविवारची सलग सुटीमुळे पवना धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी करीत वर्षाविहार आणि निसर्गभ्रमणाचा आनंद लुटला.
पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, बेडसे लेणी, श्रीक्षेत्र दुधिवरे, आंबेगाव व दुधिवरे येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. अशा अनेक ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्यटक भिजण्याचा आनंद पवना धरण परिसरात घेत आहेत. पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेता घेता गरमागरम भजी, मक्याचे कणीस, कांदा भजी खाण्याचा आणि वाफाळलेल्या चहाचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. पवनानगर चौक हा पर्यटकांनी फुलून गेलेला दिसत होता.
पर्यटकांना वाहतूककोंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. काही पर्यटक हुल्लडबाजी करताना गाडी रस्त्यावर उभी करून नाचतात. त्यामुळे इतर पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्तीचा पोलीस बंदोबस्त धरण परिसरात देण्यात यावी, अशी मागणी संजय मोहळ, माऊली आढाव, मंगेश कालेकर, रमेश कालेकर व स्थानिकांकडून करण्यात येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार आर. एस. पलांडे, नाईक दादा जगताप, कॉन्स्टेबल सुनील गवारी, कमलेश घुले यांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी परिश्रम घेतले. हुल्लडबाजांवर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.