आता बोला! कोरोना चाचणीशिवायच 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 02:50 PM2021-01-13T14:50:02+5:302021-01-13T14:50:51+5:30
एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची चाचणीसाठी यंत्रणाच नाही
पुणे : जिल्ह्यातील 650 ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, या निवडणुकीसाठी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु कोरोना चाचणी न करताच या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाला लावले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची चाचणीसाठी यंत्रणाच नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 746 ग्रामपंचायती निवडणुका जाहीर झाल्या आहेत, यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, आता 650 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यासाठी तब्बल 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, तयारी अखेरच्या टप्प्यात आली आहे. यासाठी एक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 2 हजार 461 मतदान केंद्र असून, सुमारे 12 हजार 305 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
-------
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्याची नियुक्ती
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने प्रशासनाकडून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर पुरवण्यात येणार आहे. तसेच मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर एक आरोग्य कर्मचा-याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
----
- मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : 650
- एकूण मतदान केंद्र : 2461
- निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार : 11007
- निवडणूक अधिकारी, कर्मचारी : 12305