आता बोला! शंभर कोटी रूपयांच्या खोट्या नोटा पकडून देतो सांगत पोलिसांचीच फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 07:54 PM2021-02-23T19:54:47+5:302021-02-23T19:56:00+5:30
तोतया खबऱ्याला अटक, चौघांवर गुन्हा
शिरूर : शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील खोट्या खबऱ्याला त्याच्या साथीदारांसह पुणे दहशतवादी पथक आणि पोलिसांनी न्हावरा फाटा(ता. शिरूर) येथून अटक केली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिकंदर परमेश्वर राम (वय ३२ रा. आंबेडकर नगर, वरळी, मुंबई), कमलेश जैन, प्रशांत झुटानी, के.पी. सिंग (रा. गुजरात) असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या चार आरोपींपैकी सिकंदर परमेश्वर राम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २ मार्चपर्यंत आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्याचे तीन साथीदार फरार झाल्याची माहीती पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.
याबाबत किरण श्याम कुसाळकर दहशतवादी विरोधी पथक पुणे यांनी फिर्याद दिली आहे. दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना गोपनीय बातमीदाराने रांजणगाव परिसरात १ कोटी रुपयांच्या बनावट नोटांची गोडाउन पकडून देतो त्यासाठी एक लाख रुपये द्या असे सांगितले. त्याप्रमाणे पुणे दहशतवादी विरोधी पथकाने गोपनीय बातमीदार सिकंदर राम याला सिक्रेट फंडातुन एक लाख रुपये दिले. हे गोडाऊन दाखविण्यासाठी तो मुंबईहुन जुन्या महामार्गाने लोणावळा, तळेगाव दाभाडे,चाकण येथुन शिक्रापुर मार्गे रांजणगावकडे आला. परंतु गावाजवळ आला असता त्याने गाडीच्या वेग वाढविल्याने पोलिसांना फसवल्याचा संशय आला. पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून त्याला अटक केली. तसेच त्याला दिलेली रक्कम जप्त केली.
दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, एस. आय . पवार पोलिस पथकाने दोन टीम करून खोटी माहिती देणारे गोपनीय बातमीदार सिकंदर राम यास अटक केली आहे. त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात येथे पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे करीत आहे.