सभापती पोखरकर यांना मतदानाला हजर राहण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:53+5:302021-05-31T04:09:53+5:30

पुणे : अविश्वास ठराव दाखल केल्याने चिडलेल्या खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर व त्यांच्या समर्थकांनी ...

Speaker Pokharkar allowed to attend polling | सभापती पोखरकर यांना मतदानाला हजर राहण्याची परवानगी

सभापती पोखरकर यांना मतदानाला हजर राहण्याची परवानगी

Next

पुणे : अविश्वास ठराव दाखल केल्याने चिडलेल्या खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर व त्यांच्या समर्थकांनी डोणजे येथील हॉटेलात पंचायत समिती सदस्यांना मारहाण केली होती. हवेली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अविश्वास ठरावावरील मतदानादरम्यान पोखरकर यांना पोलीस बंदोबस्तात पंचायत समितीमध्ये मतदानासाठी उपस्थित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याप्रमाणे ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता सभापती पोखरकर यांना हवेली पोलीस घेऊन जाणार आहेत. तसे आदेश प्रांत अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहेत.

खेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांच्याविरुद्ध शिवसेना व मित्रपक्ष अशा ११ सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याबाबत ३१ मे रोजी बहुमत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विरोधी गटातील सर्व जण डोणजे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते. हे पोखरकर यांना समजल्यावर त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी या हॉटेलमध्ये शिरून तोडफोड केली. सदस्यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना काही अंतरावर सोडून दिले होते. याप्रकरणी हवेली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पोखरकर यांच्यासह अनेकांना अटक केली आहे.

पोखरकर यांच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्या वेळी युक्तिवाद करताना अ‍ॅड. पवार यांनी सांगितले की, पोखरकर यांची राजकारणातील प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. त्यातूनच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी आहे. या वेळी पोखरकर यांना उपस्थित राहणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी कायद्यानुसार मतदानात काय व्हायचे ते होईल, पण उपस्थित राहण्याचा त्यांचा अधिकार डावलता येणार नाही. सध्या ते १ जूनपर्यंत हवेली पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना मतदानासाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.

त्यानुसार न्यायालयाने भगवान पोखरकर यांना पोलीस बंदोबस्तात खेड पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी ११ वाजता उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले असून तशी सूचना प्रांत यांना देण्यात आली आहे.

Web Title: Speaker Pokharkar allowed to attend polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.