"क्राईम ब्रांचमधून बोलतोय", तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: January 18, 2024 05:54 PM2024-01-18T17:54:42+5:302024-01-18T17:56:11+5:30
कारवाईची भीती दाखवून बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी सर्व पैसे दिलेल्या खात्यावर पाठवायला सांगितले
पुणे : तुमच्या नावाने मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर कुरिअर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून फसवणुकीचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरात राहणाऱ्या राजेंद्र वीरण्णा पाटील (५८) यांना अज्ञाताने १६ जुलै २०२३ रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये २०० ग्रॅम ड्रग्स आहेत. तसेच लॅपटॉप, पासपोर्ट असा मुद्देमाल आहे असे सांगितले. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच सायबर सेलला तक्रार करा. तुमचा कॉल मुंबई येथे सायबर सेलला जोडून देतो सांगून क्राईम ब्रान्चमधून बोलत असल्याचा बनाव केला. खाते व्हेरिफाय करण्यासाठी एक लिंक पाठवली. तसेच कारवाईची भीती दाखवून बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी सर्व पैसे दिलेल्या खात्यावर पाठवायला सांगितले. फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी हा सगळं प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी अज्ञातताविरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले पुढील तपास करत आहे.
अशी घ्या काळजी
- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.
- असा फोन आल्यास सर्वात आधी सायबर पोलिसांना कळवा.
- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.