"ही पुण्यभूमी शिवरायांची धरती..." मराठीत बोलून पंतप्रधानांनी जिंकली पुणेकरांची मने
By श्रीकिशन काळे | Published: August 1, 2023 01:01 PM2023-08-01T13:01:35+5:302023-08-01T13:01:50+5:30
महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
पुणे : लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक दिलेल्या महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी प्रणाम देतो, असे मराठीत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची मने जिंकली. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, मी इथे येऊन खूप भावूक झालो आहे. भारताचे गौरव आणि आदर्श लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तसेच आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. लोकमान्य हे आपल्या देशाचे तिलक आहेत. तसेच अण्णाभाऊ यांचे योगदान खूप मोलाचे आहे. दोन्ही व्यक्तींना मी नमन करतो. आज पुण्याच्या पावनभुमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ही पुण्यभूमी शिवरायांची धरती आहे. या धरतीवर ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे. त्या भुमीवर मी आज आलो आहे. आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. या सर्व महान विभुतींना मी नमन करतो.
पुरस्काराची रक्कम नमामी गंगेसाठी अर्पण-
आज मला मिळालेला सन्मान अविस्मरणीय अनुभव आहे. जी संस्था थेट लोकमान्य टिळक यांच्याशी जोडलेली आहे. त्या संस्थेकडून सन्मान मिळणं हे माझ्या भाग्याचे आहे. आपल्या देशात काशी आणि पुणे इथे विद्वत्ता चिरंजीव आहे. पुण्यनगरी सन्मान हा माझा गौरव आहे. जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी देखील वाढते. आज टिळक यांचे नाव जोडलेला पुरस्कार मला मिळाला आहे. हा सन्मान मी देशवाशीयांना अर्पण करतो. देशाच्या सेवेसाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे, तो पुरस्कार मिळणं गौरवशाली आहे. या पुरस्काराची रक्कम मी गंगेसाठी अर्पण करतो, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.