मोबाइलवरून बोलणे धोकादायक; २९ हजार वाहनचालकांवर कारवाई, ५८ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:16 IST2018-01-18T12:12:27+5:302018-01-18T12:16:26+5:30
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

मोबाइलवरून बोलणे धोकादायक; २९ हजार वाहनचालकांवर कारवाई, ५८ लाखांचा दंड
पुणे : मोबाइल हा आता आपल्या जीवनाचा भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू, अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असले तरीही वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ५८ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ फॅशन राहिला नसून ती मूलभूत गरज झाली आहे़ असे असले तरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही़ विशेषत: मोटार सायकल चालवताना बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक हँड्स फ्री सिस्टीम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टँड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असले तर अपघाताचा धोका आणखीच वाढतो.
विना गिअरच्या गाड्या अधिक धोकादायक
आता विना गिअरच्या दुचाकी गाड्यांचे प्रमाण वाढल्याने केवळ अॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी गाडी चालवता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवरील व्यक्ती काय बोलतेय, याकडे असते़ मोबाइलवर बोलणारी व्यक्ती आपल्या गाडीचा वेग कमी करते़ त्यात आजूबाजूच्या वाहनांचे आवाज व मागील वाहनांकडून वाजविले जाणारे व्हॉर्न यामुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते़ त्यातून अपघाताची शक्यता अधिक वाढते़
विना गिअरची गाडी चालविणारे वाहनचालक गाडी चालवत असताना व्हॉट्सअॅपवरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे ड्रायव्हिंगवरील संपूर्ण लक्ष उडालेले असते़ त्यामुळे अचानक कोणी मध्ये आल्यास अपघाताची दाट शक्यता असते़