फक्त आश्वासनावरच बोळवण
By admin | Published: November 18, 2016 05:53 AM2016-11-18T05:53:31+5:302016-11-18T05:53:31+5:30
वारंवार मागणी करूनही राज्यभरात ग्रामसेवकांच्या मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यातील ग्रामसेवकांनी
लोणी काळभोर : वारंवार मागणी करूनही राज्यभरात ग्रामसेवकांच्या मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यातील ग्रामसेवकांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करून बेमुदत संप पुकारला आहे, अशी माहिती हवेली तालुका ग्रामसेवक युनियन संघटनेचे अध्यक्ष मदन शेलार यांनी दिली.
राज्यभरात ३५८ तालुक्यांत गावकामगार तलाठ्यांचा संप सुरू असतानाच ग्रामसेवकही आजपासून संपावर गेल्याने शासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी याविषयी सांगितले, की वारंवार शासनाकडे मागण्या मांडूनही फक्तआश्वासन मिळाले आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांना ३ वर्षे सेवाकाल याबाबत निर्णय घेणे, ग्रामसेवकावर चुकीच्या झालेल्या कार्यवाही रद्द करणे, दरमहा प्रवासभत्ताबाबत निर्णय, ग्रामसेवक संवर्गातील शैक्षणिक अर्हता पदवीधर असणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा असावी, १२ जून २०१३चे विनाचौकशी फौजदारी परिपत्रक मागे घेणे, राज्यभरात होणारे हल्ले, मारहाण व खोट्या केसेस याबाबत सेवा संरक्षण, २००५नंतर सेवेतील ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या मागण्या आहेत.
हवेलीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे ग्रामसेवकांनी आपल्या कार्यालयातील शिक्के व चाव्या जमा केल्यानंतर पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत बसून आपला निषेध नोंदविला.
या वेळी हवेली ग्रामसेवक युनियन संघटनेचे उपाध्यक्ष अभय निकम, अनिल बगाटे, बाळासाहेब गावडे, सारिका कडूसकर, अनिल कुंभार, मधुकर दाते, पोपट वेताळ, शीतल आटोळे, रेखा ननवरे, कानिफनाथ थोरात, सदाशिव आढाव, संदीप ठवाळ, डी. के. पवार, प्रदीप ढवळे, महेश दळवी, विद्याधर ताकवणे, कैलास कोळी, विलास काळे, प्रल्हाद पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
पाचशे व हजार रुपये किमतीच्या नोटा बदलून घेणेकामी सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत. त्यातच राज्यात तलाठी व ग्रामसेवक संपावर गेल्याने शेतकरी व नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. (वार्ताहर)