'स्पेशल २६ स्टाईलने' सोनाराला लुटले; मित्रच निघाला या कटाचा मुख्य सुत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:38 PM2021-08-29T19:38:12+5:302021-08-29T19:38:21+5:30
प्राप्तीकर विभागातील अधिकारी असल्याची बतावणी करून ३५ लाखांची लूट केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस
पुणे : कात्रज परिसरातील जांभुळवाडी भागात एका सराफ व्यावसायिकाच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी प्राप्तीकर विभागातील अधिकारी असल्याची बतावणी करून ३५ लाखांची लूट केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी त्वरीत तपास करून आरोपींना कोल्हापुरातून अटक केली. आरोपींकडून मोटार, दागिने, रोकड असा ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांकडे तक्रार देताना बरोबर असलेला फिर्यादीचा मित्रच कट रचणारा मुख्य सुत्रधार निघाला आहे.
व्यास गुलाब यादव (वय ३४, सध्या रा. जांभुळवाडी, मूळ रा. बिहार), श्याम अच्युत तोरमल (वय ३१, रा. धनकवडी), किरण कुमार नायर (वय ३१, रा. भोसरी), मारुती अशोक सोळंके (वय ३०), अशोक जगन्नाथ सावंत (वय ३१, दोघे रा.माजलगाव, जि. बीड), उमेश अरूण उबाळे (वय २४, रा. भोसरी), सुहास सुरेश थोरात (वय ३२, रा. कराड), रोहित संभाजी पाटील (वय २३, सध्या रा. चर्हाली, मूळ रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर आदी यावेळी उपस्थित होते.
यादव आणि सराफ व्यावसायिक मित्र आहेत. यादवने साथीदार तोरमलबरोबर संगनमत करून सराफाच्या घरातील ऐवज लुटण्याचा कट रचला होता. २६ ऑगस्ट रोजी सराफ व्यावसायिक घराबाहेर आरोपी यादव याच्याबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी यादवचे साथीदार मोटारीतून सराफाच्या घराजवळ आले. त्यांनी प्राप्तीकर विभागातील अधिकारी असल्याची बतावणी सराफाकडे केली.
पोलिसांनी तातडीने तपास करून कोल्हापूर परिसरात सापळा लावून पसार आरोपींना पकडले. त्या वेळी पोलिसांना पाहताच आरोपींनी मोटार पुढे नेली. मोटार थांबविण्याच्या प्रयत्नात झटापटीत २ पोलिसांना दुखापत झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
तीन आरोपी संगणक अभियंता
सराफाला लुटणारे भैय्यासाहेब मोरे, रोहित पाटील, श्याम तोरमल हे संगणक अभियंता आहेत. तोरमलला एका अँप कंपनीत कामाला आहे. व्यास, यादव आणि तोरमल मुख्य सूत्रधार आहेत. सराफाला लुटून इतर आरोपी पसार झाल्यानंतर यादव सराफाबरोबर बरोबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेला होता. तपासात मिळालेल्या माहितीनंतर यादवला ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्याने कबुली दिली. आरोपींनी जंगली महाराज रस्त्यावर एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन सराफाला लुटण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. व्यास आणि सराफ हे एकमेकाचे मित्र आहेत. त्यांच्या दुकानावर व्यास हा कायम असायचा. सराफ व्यावसायिक हे दुसरे दुकान घेत असल्याची त्याचा माहिती होती. त्यावरुन त्याने इतराच्या मदतीने स्पेशल २६ प्रमाणे कट रचला. आरोपींनी त्यांना गाठले, तेव्हा व्यासच फिर्यादीच्या बरोबर होता. आरोपींनी अगोदर घरातील २५ किलो सोने आहे. ते व ७५ लाख रुपये दे, अशी मागणी केली होती. तेव्हा त्यांनी एवढी रक्कम माझ्याकडे नाही. आणि घरात असलेले सोने ग्राहकांचे आहे,असे सांगितले होते. तेव्हा व्यासच हा सराफाच्या घरी जाऊन २० लाख रुपये व ३० तोळे सोने घेऊन आला होता.
आरोपी पळून गेले. तेव्हा मात्र, व्यावसायिक पोलिसांकडे जाऊ नये, म्हणून त्याच्याबरोबर राहिला होता. दुसऱ्या दिवशी तक्रार देतानाही तो त्यांच्या समवेत होता. त्यामुळेच पोलिसांना त्याचा संशय आला. काही तासांमध्ये आरोपीचे लोकेशन समजल्यावर पोलिसांनी कोल्हापूरातील गडहिंग्लज ते हमीदवाडा या दरम्यान आरोपींना पळून जाताना ताब्यात घेतले.