भजन स्पर्धेत सहभागी कैद्यांना शिक्षेत विशेष माफी; कारागृह महानिरीक्षकांचा मोठा निर्णय
By विवेक भुसे | Published: June 28, 2023 03:37 PM2023-06-28T15:37:17+5:302023-06-28T15:39:04+5:30
कैद्यांच्या वागणूकीत सुधारणा व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उपक्रमाचा भाग म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती
पुणे : पंढरपूर वारीनिमित्त राज्यात कारागृहात भजन व अभंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील २९ कारागृहामधील ३५० हून अधिक कैदी सहभागी झाले होते. या कैद्यांना त्यांच्या शिक्षेत ३० दिवसांपासून ९० दिवसांपर्यंत विशेष माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी हा निर्णय घेतला आहे.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी १३ जून रोजी येरवडा कारागृहात घेण्यात आली. त्यात कोल्हापूरचा संघ विजेता ठरला. येरवडा द्वितीय तर नाशिकच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला होता.
याबाबत अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी. त्यांच्यात सकारात्मक मानसिकता तयार व्हावी, या दृष्टी चांगल्या गोष्टी करणार्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार माफी दिली जाते. स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्यांना एकत्रित विशेष माफी देण्याचा हा प्रथमच निर्णय घेतला आहे.
कैद्यांच्या वागणूकीत सुधारणा व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उपक्रमाचा भाग म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धचे नीटनिटके आयोजन, कैद्यांमधील उत्साह व शिस्त पाहून अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाअंतिम फेरी करीता निवड झालेल्या दोघांनी संघातील कैद्यांना ९० दिवस माफी मिळणार आहे. तसेच स्पर्धेत उल्लेखनीय प्रदर्शन करुन उत्तेजनाथ पारितोषिक मिळालेल्या कारागृह संघातील कैद्यांना ६० दिवस व इतर सर्व सहभागी संघांतील कैद्यांना ३० दिवस माफी देण्यात येणार आहे.
''ही माफी मिळाल्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक मानसिकता तयार होईल. तसेच त्यांची कारागृहातून लवकर सुटका होऊन त्यांचे समाजात पुनर्वसन होण्यास मदत होईल.- अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक.''