पोस्ट कोव्हिड रुग्णांवर नव्या वर्षापासून विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:17+5:302020-12-26T04:09:17+5:30
सेंटरची संख्याही वाढवणार : आरोग्य केंद्रामध्ये क्लिनिक लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ...
सेंटरची संख्याही वाढवणार : आरोग्य केंद्रामध्ये क्लिनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करत असताना पोस्ट कोव्हिड रुग्णांसाठीही ओपीडी सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातर्फ १ जानेवारीपासून कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. पोस्ट कोव्हीड सेंटरची संख्याही वाढवली जाणार आहे.
जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालये आणि ५ उपजिल्हा रुग्णालये येथे पोस्ट कोव्हीड सेंटर्समध्ये पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरू केली आहे. आयसीयूमधून उपचार घेतलेले रुग्ण, ऑक्सिजनवर असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर पोस्ट कोव्हीड ओपीडीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. डिस्चार्ज देताना त्यांना पुढील तपासणीच्या तारखा, चाचण्या, औषधे याबाबत लेखी माहिती दिली जाते. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या
सर्वसाधारण बैठकीत पोस्ट कोव्हिड सेंटरचा अभाव असल्याची बाब समोर आली होती. जिल्ह्यात करोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाली असली, तरी बाधित रुग्णांना नंतर उपचार देण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोस्ट कोव्हीड सेंटरच्या अभावाबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातून क्लिनिक सुरू करणार असल्याचे आश्वासन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.
-------
यांनी घ्यावी काळजी -
* आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रूग्ण-
* उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रूग्ण-
* कोरोनातून बरे झालेले ज्येष्ठ नागरिक
-------
* जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या - 3,59,090
* बरे झालेल्यांची संख्या - 3,42,708
* सध्या उपचार घेत असलेल्यांची संख्या - 7809
------
ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पोस्ट कोव्हीड सेंटर सुरू आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोरोनानंतर फारसा त्रास होत नाही. ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असलेले रुग्ण, आयसीयू, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देताना पुन्हा तपासणीसाठी कधी यायचे, याचे वेळापत्रक दिले जाते.
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य चिकित्सक