सिरम इन्स्टिटयूटकडून मोदींना खास सन्मानचिन्ह भेट ; 'पीएनजी'ज्वेलर्सने केले आहे विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 05:35 PM2020-11-28T17:35:46+5:302020-11-28T18:38:32+5:30
'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारे सन्मानचिन्ह तयार करण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे.
पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पाहणी करण्यासाठी आणि कोव्हीशिल्ड लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटतर्फे खास सन्मानचिन्ह देऊन नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले जाणार आहे. हे सन्मानचिन्ह पी एन गाडगीळ अर्थात पीएनजी ज्वेलर्स येथे तयार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सौरभ गाडगीळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला पोहोचले आहेत. सकाळी 12:30 ला हा दौरा आयोजिला होता. मात्र भारतामध्ये अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथल्या भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट असा हा आजचा एकूण दौरा असल्याने विलंब झाला आहे. त्यामुळे दुपारी 4:45 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेत.
सीरमकडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे. कारण लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचं उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटनं मिळवले आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा करत आहेत. खूप कमी वेळेसाठी म्हणजेच तासाभराचा हा दौरा आहे.
सन्मानचिन्ह तयार करण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान...
'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारे सन्मानचिन्ह तयार करण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे. आईची बाळाप्रती असणारी काळजी दर्शवणारे हे सन्मानचिन्ह' आहे', अशा शब्दांमध्ये सौरभ गाडगीळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.