म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी इंदापूरमध्ये विशेष शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:21+5:302021-05-31T04:09:21+5:30
इंदापूर : तालुक्यातील ज्या नागरिकांना कोरोना आजार झाला होता. यातून जे रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. अशा सर्व ...
इंदापूर : तालुक्यातील ज्या नागरिकांना कोरोना आजार झाला होता. यातून जे रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. अशा सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करून म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यात विशेष शिबिर भरवण्यात येईल. यामुळे पुढे होणारा रुग्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने तत्काळ घ्यावी, अशा सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य सभागृहात इंदापूर तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची व पदाधिकारी यांची आढावा बैठक शनिवार (दि.२९) रोजी सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, बहुजन मुक्ती पार्टी चे ॲड. राहुल मखरे, पीआरपीचे नेते संजय सोनवणे, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, तसेच इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, नगरसेवक स्वप्निल राऊत, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यात जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीदेखील, आरोग्य विभागाने तसेच तालुक्यातील नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. कोरोना अजून हद्दपार झालेला नाही. कोरोना नाही या भ्रमात कोणीही राहू नये, काळजी घ्या, असे आवाहन केले.
इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील बालक तिसऱ्या लाटेत सापडू नये यासाठी प्रत्येक पालकांना आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या वतीने माहिती पुस्तका घरपोच केली जाईल. इंदापूरच्या आरोग्य विभागासाठी एक कोटी रकमेचे नवीन अद्ययावत साहित्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केलेले आहे. आणखी बालरोग तज्ज्ञ यांची टीम तयार केली असून जी उपचारासाठी साधनसामग्री लागणार आहे. ती लवकर उपलब्ध केली जाईल, अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
३० इंदापूर
इंदापूर येथील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे