वाचन, लेखन कौशल्य विकासासाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:37+5:302021-04-14T04:10:37+5:30

पुणे : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद असल्याने‌ त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांची लेखन व वाचनाची ...

Special campaign for reading, writing skills development | वाचन, लेखन कौशल्य विकासासाठी विशेष मोहीम

वाचन, लेखन कौशल्य विकासासाठी विशेष मोहीम

Next

पुणे : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद असल्याने‌ त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांची लेखन व वाचनाची गती मंदावली आहे. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यासंदर्भात विचार केला जात आहे. त्या-त्या वर्गात विद्यार्थ्यांचे अपेक्षित वाचन व लेखन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स तयार करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

वर्षभरापासून विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षणाला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने विकसित होणारे लेखन कौशल्य आणि वाचन कौशल्य यावर चांगलाच परिणाम झाला आहे. विद्यार्थी वर्गामध्ये असताना शिक्षक त्याच्या वाचन व लेखनाकडे लक्ष देतात. त्यातून विद्यार्थ्यांचे हे दोन्ही कौशल्य विकसित होण्यास मदत होते. परंतु, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक प्रगतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली आहे.

--

ऑनलाइन शिक्षणामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या लेखन व वाचन कौशल्यावर परिणाम झाला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. शिक्षण विभागातर्फे याबाबत विचार केला जात आहे.

- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

---

सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्ये विकासित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार करण्याचा विचार केला जात आहे.

- दिनकर टेमकर, संचालक एससीईआरटी

--

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची प्रगती श्रावण, भाषण, वाचन आणि लेखन या चार कौशल्यांशी निगडित असते. शाळा बंद असल्यामुळे त्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पालकांनी व शिक्षकांनी यात पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढता येईल. शिक्षकांच्या मदतीने पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्यावा. शक्य झाल्यास परिसरातील समवयस्क मुलांचे गट तयार करून त्यांचे वाचन व लेखन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करावा.

- गोविंद नांदेड, माजी संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

--

विद्यार्थ्यांनी वर्षभर लिखाणच केले नाही. अर्ध्या तासाच्या लिखाणाला काही विद्यार्थ्यांना दोन तास लागत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे.त्यामुळेच इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा वेळ वाढवून दिला. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेखन व वाचन कौशल्याकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे पालकांची भूमिका यात महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी दिलेले लेखन विद्यार्थी वेळेत पूर्ण करतात की नाही हे पालकांनी तपासणे आवश्यक आहे.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ

Web Title: Special campaign for reading, writing skills development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.